अकोला : रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला यांच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत तब्बल १ किलो ८८७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून याची अंदाजे किंमत २८ हजार ३०५ रुपये इतकी आहे. ही कारवाई एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे.
आज दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, अकोला रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम गांजाची वाहतूक करीत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी तात्काळ हालचाल करत नियोजनबद्ध सापळा रचला.
यानुसार अकोला रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरील बुकिंग परिसरात संशयित इसमावर पाळत ठेवण्यात आली. संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्या इसमास ताब्यात घेत तपासणी केली. तपासणीदरम्यान त्याच्या जवळील सॅकबॅगमध्ये खाकी रंगाच्या सेलोटेपने चिटकवलेला एक बंडल आढळून आला.
Related News
सदर बंडल उघडून पाहता त्यामध्ये ओलसर फुलं, बिया व काडीदार हिरवटसर रंगाचा प्रतिबंधित गांजा आढळून आला. वजन करण्यात आले असता त्याचे एकूण वजन १ किलो ८८७ ग्रॅम असल्याचे स्पष्ट झाले. या गांजाची बाजारभावानुसार किंमत २८,३०५ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश बाळू आंभोरे (वय २५ वर्षे) असे असून तो अब्दुल हमीद चौक, संजय नगर, नायगाव, अकोला येथील रहिवासी आहे. आरोपीने सदर अंमली पदार्थ स्वतःकडे बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध लोहमार्ग पोलीस स्टेशन, अकोला येथे एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गांजा आरोपीने कोठून आणला होता, कोणासाठी आणला होता व तो कुठे नेणार होता, याबाबत सखोल तपास सुरू असून, यामागे कोणते मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचाही शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. आरोपीकडून अधिक चौकशी करण्यात येत असून पुढील कारवाई प्रक्रियेत आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (लोहमार्ग), अकोला पांडूरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप डोलारे, पोलीस उपनिरीक्षक देवराम ढगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीशसिंग चव्हाण, तसेच पोलीस हवालदार विलास पवार, पोलीस शिपाई दीपक वाटाणे, इरफान पठाण, विजय शेगावकर, कपिल गवई, विजय जगणीत, कुणाल साखरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
रेल्वे पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे अंमली पदार्थांची वाहतूक रोखण्यास मोठे यश मिळाले असून, शहर व रेल्वे परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/state-spokesperson-of-nationalist-congress-sharadchandra-pawar-paksha-ad/
