शिवराज्याभिषेकाचे स्मरण करत शेंदूरजनमध्ये वृक्षारोपणाचा संकल्प; पाहुण्यांना ताट-वाट्यांचे विनामूल्य वाटप

वृक्षारोपणाचा

शेंदूरजन, प्रतिनिधी : ग्रामपंचायत शेंदूरजनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन आणि जागतिक पर्यावरण दिन विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी प्रकाश आढाव यांनी केले. त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करताना सांगितले की, ६ जून १६७४ रोजी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण होता. या घटनेमुळे जनतेमध्ये स्वाभिमान जागृत झाला आणि सर्वसामान्यांच्या हक्कांचे राज्य निर्माण झाले.

यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक नागरिकाने झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. पर्यावरण रक्षणासोबतच प्लास्टिकमुक्त गावाच्या संकल्पनेलाही चालना देण्यात आली. गावातील लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने ताट, पेले आणि वाट्या विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन वापरानंतर साहित्य जबाबदारीने परत करावे, असे आवाहन करण्यात आले.

Related News

कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सदस्य खुशालराव शिंगणे, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक नंदकिशोर शिंगणे, विठोबा शिंगणे, विनोद कोठारी, बाळू शिंगणे, भगवानराव शिंगणे, घनश्याम सरडे, साहेबराव लेंडगुते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश शिंगणे, भगवान जाधव, राजू शिंदे, विष्णू डवके आणि पवन गवई यांनी विशेष परिश्रम घेतले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

read also :  https://ajinkyabharat.com/draining-the-battery-of-a-mobile-phone-will-spoil-it-or-cause-death-stop-it-immediately-otherwise-you-will-suffer-loss/

Related News