अकोट : महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २२ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून जि. प. शाळा लोहारी खु. येथे शाळास्तरीय गणित प्रदर्शनी अत्यंत उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे, गणिताची भीती दूर करणे तसेच दैनंदिन जीवनाशी गणिताचा संबंध स्पष्ट करणे या उद्देशाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
या गणित प्रदर्शनीचे आयोजन गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षिका सोनाली निचळ यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक नितीन धोरण यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून आले.
प्रास्ताविकात शिक्षिका सोनाली निचळ यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करत सांगितले की, गणित हा विषय केवळ पाठांतरापुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष अनुभवातून समजावा, यासाठी अशा प्रदर्शनांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या प्रतिकृतींमधून गणितातील संकल्पना सहज आणि सोप्या पद्धतीने समजून घेतल्या तर गणिताविषयी आपुलकी निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.
Related News
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक नितीन धोरण यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. “गणित हा भीतीचा नव्हे, तर आनंदाचा विषय आहे. योग्य मार्गदर्शन आणि उपक्रमशील शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थी गणितात नक्कीच प्राविण्य मिळवू शकतात,” असे मत त्यांनी व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच त्यांची विचारशक्ती विकसित होते, असेही त्यांनी सांगितले.
या गणित प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पनांवर आधारित एकूण ३१ आकर्षक व उपयुक्त प्रतिकृती सादर केल्या. यामध्ये अंकांची ओळख, बेरीज-वजाबाकी, लहान-मोठेपणा, घनफळ व क्षेत्रफळ, घड्याळ व वेळेचे मोजमाप, अपूर्णांक, कालमापन, तसेच दैनंदिन जीवनातील गणितावर आधारित विविध मॉडेल्सचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रतिकृतीची माहिती आत्मविश्वासाने समजावून सांगत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, तर्कशक्ती, निरीक्षण क्षमता तसेच स्वतःच्या विचारांचे सादरीकरण करण्याची कला विकसित होत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. गणित शिकण्याची ही कृतीशील पद्धत विद्यार्थ्यांसाठी अधिक रंजक आणि प्रभावी ठरली.प्रदर्शनीस उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी दाखवलेली कल्पकता आणि मेहनत पाहून पालकांनाही समाधान व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक नितीन धोरण, शिक्षिका सोनाली निचळ, रुपाली ढवळे आणि सोनाली उज्जैनकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.शाळेत आयोजित करण्यात आलेली ही गणित प्रदर्शनी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली.
