दुर्गुणांच्या होळीचा संकल्प; जय बजरंग विद्यालय चान्नी येथे स्काऊट-गाईडचा अनोखा उपक्रम

दुर्गुणांच्या

अकोला तालुक्यातील जय बजरंग विद्यालय, चान्नी येथील विद्यार्थ्यांनी होळी सणाच्या निमित्ताने एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवित ‘दुर्गुणांच्या होळीचा’ संकल्प केला. लोकमान्य टिळक स्काऊट युनिट, अहिल्याबाई होळकर गाईड युनिट तसेच सावित्रीबाई फुले गाईड युनिटच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

होलिका दहनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी स्वतःमधील वाईट सवयी आणि दुर्गुणांचा नाश करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या एखाद्या दुर्गुणाचे नाव कागदावर लिहून ते होळीमध्ये टाकून त्या दुर्गुणाचा कायमचा त्याग करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षणाची जाणीव निर्माण झाली तसेच चांगल्या सवयी अंगीकारण्याचा संदेशही देण्यात आला.

उपक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवत आवारातील केरकचरा गोळा केला. त्यानंतर प्राचार्य संग्राम इंगळे यांच्या हस्ते जमा केलेल्या कचऱ्याची होळी पेटवण्यात आली. होळीभोवती गोल करून उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आपापले दुर्गुण वाचून दाखवले आणि त्या दुर्गुणांचा त्याग करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे स्वच्छता, आत्मशुद्धी आणि सामाजिक जाणीव यांचा संगम पाहायला मिळाला.

Related News

यावेळी प्रा. गजानन गाडगे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन केले. रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंग तयार करून त्यांचा वापर करण्याचा संदेश त्यांनी दिला. तसेच सण साजरे करताना पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने ओळखली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमाचे आयोजन स्काऊट शिक्षक वसंत ढोकणे यांनी केले. त्यांना कला शिक्षक एस. आर. गोपनारायण, इको क्लबचे प्रभारी शिक्षक संजय जायभाये तसेच गाईड कॅप्टन भावना भांडे यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाला गजेंद्र भालेराव, संजय खडके, गणेश कालापाड, संजय बोचरे, रामेश्वर राठोड, श्रीमती शारदा गाडेकर, मंगेश शिरसाट, गोपाल सूर्यवंशी, विजय भोपळे आणि दयाराम शेगोकर यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव दृढ झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/anandi-tv-serial-2-powerful-comeback-of-veteran-actors-sameer-dharmadhikari-and-arun-nalawade-important-roles-in-anandi-series/

Related News