मुर्तीजापुर परिसरात सोयाबीन उत्पादकाच्या डोळ्यात अश्रू
अकोला, दि.19 प्रतिनिधी : मुर्तीजापुर परिसरात परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाची दाणादाण उडवली आहे. मुर्तीजापुर मतदार संघातील विविध शेतशिवारात पाणीच पाणी साचले आहे. सोयाबीन काढण्याची वेळ येताच पावसाने तांडव सुरू केले, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एकरी २० – २५ हजार रुपये खर्च झाला व उत्पन्न एकरी २ ते ३ क्विंटल होत आहे. बाजारात सोयाबीनला ३५००
ते ४००० रूपयापर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे २० ते २५ हजार रुपये खर्च एकरी झाल्यावर उत्पन्न १२ ते १५ हजार रुपये हाती येत आहे, अशा परिस्थितीत सोयाबीनची शेती परवडणारी आहे का ?
मुर्तीजापुर परिसरातील शेतकरी दरवर्षी प्रामुख्याने सोयाबीनची लागवड करतात. मात्र सोयाबीन ला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. महागाई सातत्याने वाढत आहे मात्र गेल्या चार वर्षांपूर्वी सोयाबीनचा जो भाव होता तोच आजही कायम आहे. बी बियाणे, खते मजुरीचा, फवारणीचा खर्च करूनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न होत नाही. दिवाळी सण जवळ आलेला आहे पुन्हा हरभरा, गहू पिकाची रब्बीची पेरणी करण्यासाठी पैशाची गरज आहे. शेतकरी संकटात सापडलेला आहे. शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत करावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण पीकं कर्ज माफ करावे अशी एकमुखी मागणी शेतकरी मोठ्या प्रमाणावर करीत आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणाने फारसा फायदा झाल्याचे दिसून येत नाही. मुर्तीजापुर मतदार संघातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
शेतकरी आपले पीक उभं करण्यासाठी पीक कर्ज घेतो, उसनवारी करतो. सावकाराकडून पैसे घेतो अशा परिस्थितीत शेती कशी परवडणार आहे, शेतकरी आत्महत्या वाढण्यामागचे हे प्रमुख कारण आहे. शेतातील कृषी निविष्ठाची किंमत खूप महाग झाली. सोयाबीन बॅग ४००० रुपये, खते महाग झाली, कीटकनाशक महाग झाले, मजुरांच्या टंचाईमुळे सोयाबीन सोगंणीसाठी ३००० रुपये मजूर घेत आहे व इतरही खर्च खूप आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
२५ जूनला शेतात सोयाबीनची पेरणी केली ४००० रुपये बॅग प्रमाणे बियाणे विकत घेतले ,पेरणीपासून तर सोंगणी पर्यंत एकरी २० ते २५ हजार रुपये सोयाबीन पिकावर खर्च झाला, सोयाबीन काढल्यानंतर एकरी २ ते ३ क्विंटल उतारा आहे, खर्च जास्त उत्पादन कमी. अशा परिस्थितीत शेतकरी शेती करावी की कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे?
– अरविंदराव गाडवे.
शेतकरी, खिनखिनी.
——————————————————————————————————————————————————————-
——————————————————————————————————————————————————————-
पेरणी करून तीन ते चार महिन्यात सोयाबीन पिकावर भरपूर खर्च आला. मात्र सोयाबीन सोंगणीनंतर उत्पादन एकरी २ ते ३ क्विंटल झाल्याने झालेला खर्च निघाला नाही. मजुराला व मशीनवाल्यांना जवळचे पैसे द्यायचे काम पडले. पुढील शेतीचा मशागत खर्च व दिवाळी, घर खर्च कसा करावा यासाठी शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ अनुदान द्यावे.
– अनील लाखे, शेतकरी
गाजीपूर.
——————————————————————————————————————————————————————-
——————————————————————————————————————————————————————-