देशाची आर्थिक सत्ता मूठभर लाेकांच्या हाती एकवटली माजी सरन्यायाधीश : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे थाटात अनावरण

जवाहरलाल दर्डा

यवतमाळ : देशाची राज्यघटना ही काेणत्याही धर्मग्रंथापेक्षा माेठी आहे. यातून देशात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानता संविधानाला अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत देशाची आर्थिक सत्ता ही मूठभर लाेकांच्या हाती एकवटली आहे. देशातील समानतेसाठी स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजींनी ब्रिटिश राजवटीविराेधात लढा उभा केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही बाबुजींनी विकसित समाज घडवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरून माेलाचे याेगदान दिले. यवतमाळसारख्या मागास जिल्ह्यात उद्याेग उभारले, शिक्षणासाठी संस्था उभ्या केल्या. एकूणच घटनेला अपेक्षित सामाजिक, आर्थिक व राजकीय समानता कशी आणता येईल, यावर बाबुजींनी भर दिल्याचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले. ते शनिवारी सायंकाळी स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा काॅलेज ऑफ लाॅ येथे बाबुजींच्या पुतळा अनावरणप्रसंगी बाेलत हाेते.

माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, राज्यघटनेतील तत्त्व आणि वडील दादासाहेब गवई यांची शिकवण मी नेहमीच आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. देशाचा सरन्यायाधीश म्हणून खुर्चीवर बसलाे असताना शेवटच्या घटकाला डाेळ्यापुढे ठेवून काम करत राहिलाे. झुडपी जंगलाचा गंभीर प्रश्न हाताळताना पर्यावरणाची हानी हाेणार नाही व त्या परिसरात वास्तव्य करणारे, शेती करणारे शेतकरी-शेतमजूर यांचाही हक्क डावलला जाणार नाही, असा समताेल राखत निर्णय दिला. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. इतकेच नव्हे तर अनेक सिंचन प्रकल्प, शाळा, रुग्णालये, घरे बांधकामाचा मार्ग यातून माेकळा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुतळा अनावरण साेहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’ मीडिया ग्रुपचे चेअरमन डॉ. विजय दर्डा तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल एस. किलोर, यवतमाळ जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती वृषाली व्ही. जोशी, यवतमाळचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर सी. मुनघाटे, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठाेड, आमदार बाळासाहेब मांगुळकर, बार काैन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके, कार्यकारिणी सदस्य माजी आमदार कीर्ती गांधी, विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सीए. प्रकाश चाेपडा, विद्या प्रसारक मंडळ कार्यकारिणी सदस्य किशाेर दर्डा, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता आणि शैक्षणिक विकास समितीचे अध्यक्ष ॲड. फिरदोस मिर्झा, डाॅ. ललित निमाेदीया, ॲड. पंकज ओस्वाल, प्राचार्य डॉ. विजेश मुनोत आदी उपस्थित हाेते.

Related News

डाॅ. विजय दर्डा यांनी स्वागतपर भाषणातून विद्या प्रसारक मंडळाद्वारे संचलित विधी महाविद्यालय व अमाेलकचंद महाविद्यालयाच्या एकूण वाटचालीची माहिती दिली. या शैक्षणिक संस्थांमधून अनेक उच्चपदस्थ व्यक्तिमत्व कशी घडत गेली हेही त्यांनी यावेळी विषद केले. एकूण शिक्षण क्षेत्रात बाबुजी व बाई (आई) यांच्या प्रेरणेतून काम करत असल्याचे ते म्हणाले. माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्तीद्वय यांचे त्यांनी विशेष आभार मानत, त्यांच्या उपस्थितीत एक ऐतिहासिक क्षण यवतमाळकर अनुभवत असल्याचे सांगितले. न्यायमुर्ती अनिल किलाेर, पालकमंत्री संजय राठाेड यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर सीए. प्रकाश चाेपडा यांनी आभार मानले.

ज्येष्ठ विधीज्ञ व माजी विद्यार्थी न्यायधीशांचा गाैरव

स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा काॅलेज ऑफ लाॅ चे विद्यार्थी असलेले नागपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा, काेल्हापूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल, चंद्रपूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म, भाेकर (जि. नांदेड) येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश माेहमंद नासीर माेहमंद सलीम यांचा माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यासाेबतच विधी क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. ए. पी. दर्डा, ॲड. आर. के. मनक्षे, ॲड. प्रवीण जानी, ॲड. एस. सी. भालेराव, ॲड. पी. व्ही. गाडबैले, ॲड. पी. एस. साबळे, ॲड. जगदीश वाधवानी, ॲड. दीपक ठाकरे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

वादळावर मात करीत यशस्वी आयोजन
अमोलकचंद महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमादरम्यान शनिवारी सायंकाळी वादळ सुरू झाले. त्यामुळे वेळेवरच काही काळ कार्यक्रम थांबवावा लागला. मान्यवर व कार्यक्रमाला आलेल्या गणमान्य तेथेच थांबले. आयोजकांनी अगदी दहा मिनिटात पर्यायी व्यवस्था करून महाविद्यालयातीलच हॉलमध्ये हा सोहळा घेण्यात आला. वादळाच्या व्यत्ययानंतरही आयोजकांच्या वेळेवरच्या यशस्वी नियोजनामुळे उपस्थितांची लक्षणीय गर्दी कायम होती. यासाठी विधी महाविद्यालय व अमोलकचंद महाविद्यालय येथील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

read also :  https://ajinkyabharat.com/shocking-2026-passport-ranking-singapore-number-1-india-80th-place-pakistans-pathetic-condition/

Related News