वडरपुरा येथे आढळलेल्या अज्ञात मृत व्यक्तीवर जय गजानन आपत्कालीन पथकाकडून विधीवत अंत्यसंस्कार

अज्ञात मृत

मूर्तिजापूर :
दि. १४ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर शहरातील वडरपुरा परिसरात एका अज्ञात मृत व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. सदर मृत व्यक्तीस तातडीने जय गजानन आपत्कालीन पथकाच्या मदतीने लक्ष्मीबाई देशमुख शासकीय रुग्णालय, मूर्तिजापूर येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

सुरुवातीला मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. मृतदेहाची अवस्था पाहता तो काही काळापासून आजारी किंवा दुर्लक्षित अवस्थेत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जय गजानन आपत्कालीन पथकाने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून तातडीने पुढाकार घेत मूर्तिजापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस आणि आपत्कालीन पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

पोलीस तपास, परिसरातील चौकशी तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे अखेर मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश आले. सदर मृत व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. ओळख पटताच संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. काही वेळानंतर मृत व्यक्तीचा भाऊ लक्ष्मीबाई देशमुख शासकीय रुग्णालयात उपस्थित झाला.

Related News

मात्र यावेळी एक हृदयद्रावक बाब समोर आली. मृत व्यक्तीच्या भावाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याला आपल्या भावावर अंतिम संस्कार करणे शक्य नव्हते. खर्च, वाहतूक आणि विधी यासाठी आवश्यक असलेली रक्कम उभारणे त्याच्यासाठी अशक्य ठरत होते. अशा कठीण परिस्थितीत भावाने आपली व्यथा व्यक्त केली.

ही बाब समजताच जय गजानन आपत्कालीन पथकाने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. पथकाचे अध्यक्ष श्री. हरीश मारुती आप्पा पिंपळे यांनी तात्काळ पुढाकार घेत मित्र मंडळाच्या सहकार्याने मृत व्यक्तीवर विधीवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून, धार्मिक विधींचे पालन करत मृत व्यक्तीवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जय गजानन आपत्कालीन पथकाचे सदस्य, मित्र मंडळाचे कार्यकर्ते तसेच काही स्थानिक नागरिक उपस्थित होते. कोणताही नातेसंबंध नसताना केवळ मानवतेच्या नात्याने केलेल्या या कार्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. मृत व्यक्तीच्या भावानेही या मदतीबद्दल भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

जय गजानन आपत्कालीन पथकाने यापूर्वीही अनेक आपत्कालीन प्रसंगात, अपघातग्रस्तांना मदत, अज्ञात मृतदेहांची ओळख पटविणे, गरजू कुटुंबांना सहकार्य करणे अशा विविध सामाजिक कार्यांत पुढाकार घेतला आहे. या घटनेतूनही पथकाची सामाजिक जाणीव, माणुसकी आणि जबाबदारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

या सामाजिक कार्याबद्दल वडरपुरा परिसरासह संपूर्ण मूर्तिजापूर शहरातून जय गजानन आपत्कालीन पथकाचे अध्यक्ष श्री. हरीश मारुती आप्पा पिंपळे, त्यांचे सहकारी आणि मित्र मंडळाचे कौतुक व्यक्त करण्यात येत आहे. अशा संस्था आणि व्यक्तींमुळेच समाजात माणुसकी अजून जिवंत आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Related News