इराण युद्धामुळे सध्या संपूर्ण जगातील राजकीय आणि आर्थिक समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. विशेषतः पश्चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे तेल आणि एलपीजी पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक होते. त्यामुळे या मार्गावर कोणताही तणाव निर्माण झाला तर त्याचा थेट परिणाम भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने तुर्कस्तान आणि सौदी अरेबियासोबत मिळून कथित ‘इस्लामिक NATO’ उभारण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगू लागली आहे. या नव्या समीकरणामुळे भारताविरोधात पश्चिम आशियात नवा दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे मानले जात आहे. मात्र, भारतानेही या खेळीला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे भारत आता केवळ पारंपरिक परराष्ट्र धोरणावर अवलंबून राहत नसून, पश्चिम आशियातील प्रत्येक देशासोबत संतुलित आणि व्यावहारिक संबंध मजबूत करण्याच्या दिशेने पुढे जात आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE), इस्रायल आणि इराण या तिन्ही देशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Related News
इटलीचे भू-राजकीय तज्ज्ञ सर्जिओ रेस्टेली यांनी ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’मध्ये लिहिलेल्या लेखामुळे या चर्चेला आणखी वेग आला आहे. त्यांच्या मते, भारताने पश्चिम आशियात अत्यंत स्मार्ट आणि संतुलित भूमिका घेतली आहे. एका बाजूला भारत इस्रायलसोबत संरक्षण, तंत्रज्ञान, कृषी, सायबर सुरक्षा आणि जल व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य वाढवत आहे, तर दुसऱ्या बाजूला यूएईसोबत गुंतवणूक, व्यापार, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात संबंध अधिक मजबूत करत आहे.
दुसरीकडे, भारताने इराणसोबतचे संबंधही कायम ठेवले आहेत. विशेषतः चाबहार बंदर प्रकल्पामुळे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे इराण भारतासाठी केवळ ऊर्जा भागीदार नाही, तर सामरिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा देश मानला जातो.
सर्जिओ रेस्टेली यांच्या मते, भारताचे हे धोरण पाकिस्तानसाठी मोठे आव्हान ठरू शकते. कारण पाकिस्तान ज्या प्रकारे धार्मिक आधारावर नवीन गट तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्या उलट भारत आर्थिक विकास, स्थिरता आणि प्रादेशिक सहकार्यावर भर देत आहे. त्यामुळे अनेक आखाती देश भारताकडे अधिक विश्वासाने पाहत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील यूएई दौऱ्यालाही मोठे महत्त्व दिले जात आहे. पश्चिम आशियात संघर्ष वाढत असताना मोदी यांनी अबू धाबीमध्ये जाऊन द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला. तज्ज्ञांच्या मते, हा दौरा केवळ राजनैतिक नव्हता, तर भारताच्या दीर्घकालीन रणनीतीचा महत्त्वाचा भाग होता.
भारतासाठी आखाती देशांमधील स्थिरता अत्यंत आवश्यक आहे. कारण भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करतो. होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा निर्माण झाल्यास भारतातील महागाई, उद्योग आणि वाहतूक क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारत पश्चिम आशियात शांतता राखण्यासाठी सक्रिय भूमिका घेत असल्याचे स्पष्ट दिसते.
युएईबाबत बोलायचे झाले तर, हा देश आता भारताचा अत्यंत विश्वासू आर्थिक भागीदार बनला आहे. गुंतवणूक, फूड सिक्युरिटी, लॉजिस्टिक्स, बंदरे, डिजिटल तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य झपाट्याने वाढत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, भारत-यूएई संबंध हे आता केवळ तेल व्यापारापुरते मर्यादित राहिलेले नाहीत.
इस्रायलसुद्धा भारतासाठी महत्त्वाचा सहकारी बनला आहे. ड्रोन तंत्रज्ञान, संरक्षण प्रणाली, कृषी संशोधन आणि सायबर सुरक्षेत इस्रायल भारताला मोठी मदत करत आहे. त्यामुळे पाकिस्तान-तुर्कस्तान समीकरणाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी भारत-इस्रायल सहकार्य निर्णायक ठरू शकते.
याचवेळी भारताने इराणसोबत संवाद कायम ठेवण्यावरही भर दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळाले. भारताने कोणत्याही एका गटात पूर्णपणे सामील न होता सर्व देशांशी संवाद ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे.
विशेष म्हणजे भारताची ही रणनीती पश्चिम आशियात ‘बॅलन्सिंग पॉवर’ म्हणून उदयास येत असल्याचे संकेत देत आहे. पाकिस्तान धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेत असताना भारत आर्थिक भागीदारी, तंत्रज्ञान आणि स्थिरतेच्या माध्यमातून प्रभाव वाढवत आहे. त्यामुळे भविष्यात पश्चिम आशियातील राजकारणात भारताची भूमिका अधिक महत्त्वाची होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात नवीन गट आणि नवी समीकरणे तयार होत असताना भारताने अत्यंत शांत, पण प्रभावी रणनीती स्वीकारल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कथित ‘इस्लामिक NATO’च्या प्रयत्नांना भारताचा हा मोठा कूटनीतिक मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/hardik-pandya-out-big-change-for-indian-team-in-the-series-against-afghanistan/
