पातूर प्रतिनिधी : स्वप्निल सुरवाडे
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात बोडखा येथे अकोला–वाशिम मुख्य महामार्गावर सायंकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली. मालेगावहून पातूरकडे येणाऱ्या मक्झिमो चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आणि पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी चालकाच्या प्रसंगावधानामुळे व वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अकोला येथील जाजू नगर, डबकी रोड परिसरातील रहिवासी कोंडीराम बळीराम नावकार यांच्या मालकीची मक्झिमो गाडी (क्रमांक एम.एच. २६ बी.सी. ३९३७) त्यांचा मुलगा अंकुश नावकार चालवत होता. कामानिमित्त अंकुश मालेगाव येथे गेला होता. काम आटोपून तो सायंकाळी पातूरकडे परत येत असताना बोडखा गावाजवळ अचानक गाडीच्या इंजिनमधून धूर निघू लागल्याचे त्याच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले.
Related News
मोठा धक्का! 14 जणांवर गुन्हा; रवींद्र धंगेकर नॉट रिचेबल, अटकेची शक्यता वाढली
Parbhani News: परभणीतील प्रसिद्ध हनुमान मंदिरात भीषण दुर्घटना! सभा मंडप कोसळून 30 ते 40 भाविक अडकल्याची भीती; 8 मोठे अपडेट्स
गणपतीपुळे समुद्रात 5 तरुण बेपत्ता; छत्रपती संभाजीनगरच्या 19 मित्रांच्या ट्रिपवर काळाचा घाला
शिवसेनेत मोठी फूट! 6 खासदार दूर, संजय राऊतांचा संताप शिगेला
Mumbai Monorail 2026 : 7 मोठे बदल! भाडेवाढीचा जबरदस्त धक्का; 70 रुपयांपर्यंत तिकीट, 9 महिन्यांनंतर मोनोरेल पुन्हा धावणार
14 जणांचा हृदयद्रावक मृत्यू! सोलापूरच्या माळशिरसमधील भीषण पिकअप अपघाताने महाराष्ट्र हादरला
क्षणाचाही विलंब न करता अंकुशने गाडीत बसलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर उतरवले. सर्वजण रस्त्यापासून दूर सुरक्षित ठिकाणी गेले असतानाच काही क्षणांतच चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या तीव्रतेमुळे वाहनातील प्लास्टिक साहित्य, वायरिंग, टायर आणि इंधन टाकी यामुळे ज्वाळा अधिक भडकल्या. काही वेळातच संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून जळून खाक झाले.
घटनेनंतर महामार्गावर एकच धावपळ उडाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. जळणाऱ्या वाहनाचे दृश्य पाहून अनेक वाहनचालकांनी आपली वाहने थांबवली. त्यामुळे काही काळ अकोला–वाशिम मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. आगीमुळे निर्माण झालेला धूर दूरपर्यंत पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पातूर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कर्मचारी सैय्यद अश्फाक आणि प्रल्हाद वानखडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने अग्निशमन वाहनाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळातच आग नियंत्रणात आली; मात्र तोपर्यंत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले होते.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट किंवा इंजिनातील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक तपास करण्यात येणार आहे.
दरम्यान, अचानक लागलेल्या आगीमुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाहनचालकांनी नियमितपणे वाहनांची तपासणी करणे, प्रवासादरम्यान कोणताही संशयास्पद आवाज किंवा धूर दिसल्यास तात्काळ वाहन थांबवून खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून ही घटना सर्वांसाठीच एक इशारा ठरली आहे.
