अकोल्यात उष्णतेचा कहर; महानगरपालिकेकडून नागरिकांना उष्माघाताबाबत सतर्कतेचा इशारा

उष्णतेचा कहर

अकोला शहरात तापमानाने रविवारी तब्बल ४६ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. प्रचंड उष्णतेमुळे रस्त्यांवर वर्दळ कमी झाली असून दुपारच्या वेळेत शहरातील अनेक भागांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवल्याने उष्माघाताचा धोका अधिकच वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रुची पहुरकर यांनी नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, उष्णतेमुळे चक्कर येणे, मळमळ, उलटी होणे, पोटदुखी, अतिशय थकवा जाणवणे, त्वचा गरम व कोरडी होणे किंवा अचानक बेशुद्ध पडणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच वेळ न दवडता त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणे आवश्यक आहे.

महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. शहरातील प्रमुख ठिकाणी पाणपोईंची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना मोफत थंड पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच उष्माघाताचा त्रास जाणवणाऱ्यांसाठी ओआरएस (ORS) पॅकेट्सचे वाटप सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित आजारांवर उपचारासाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Related News

नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलका व सैल सुती कपड्यांचा वापर करावा तसेच डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रचंड उष्णतेच्या या लाटेमुळे नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक बनले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/talawat-fish-catch-37-year-old-youth-died-budun/

Related News