उन्हाचा कहर वाढला; महान धरणातील जलसाठा 25.82 टक्क्यांवर

महान

शेख अनिस :  महान प्रतिनिधी

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा! महान धरणातील साठा घटला

अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणातील जलसाठा दिवसेंदिवस घटत असून नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि सततच्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. 31 मे रोजीच्या आकडेवारीनुसार, महान धरणात 341.67 मीटर पाणीपातळी असून 22.304 दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. हा साठा धरणाच्या एकूण क्षमतेच्या केवळ 25.82 टक्के इतकाच राहिला आहे.धरणातील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घसरल्याने धरणाचा दुसरा व्हॉल्वदेखील पाण्याच्या वर उघडा पडला आहे. यामुळे आगामी काही आठवड्यांत पाणीसाठ्याची स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मान्सूनचे आगमन होईपर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, अकोला महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाहन धुणे, बागांना अतिरिक्त पाणी देणे तसेच इतर अनावश्यक वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून जबाबदारीने वापर केल्यास उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकवून ठेवता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मान्सूनपर्यंत पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related News

Related News