अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे कामकाज सुरू असताना नगरसेविका पती गजानन कांबळे यांनी थेट सभागृहात प्रवेश करून सभापती विजय अग्रवाल यांच्याशी वाद घातल्याने मोठा गोंधळ उडाला. सभापतींनी सुरुवातीला शांततेने “मी तुमच्याशी नंतर बोलतो” असे सांगून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कांबळे यांनी सभागृह सोडण्यास नकार देत आपले बोलणे सुरूच ठेवले.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सभापती विजय अग्रवाल यांनी “यांना सभागृहात कोणी प्रवेश दिला” असा सवाल करत संबंधितांना तातडीने बोलावण्याचे आदेश दिले. त्यांनी “अशी दादागिरी येथे चालणार नाही. मुघलाई लागली का. मला जुना विजय अग्रवाल होऊ देऊ नका” अशा शब्दांत कांबळे यांना सुनावले.
सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी लक्षात घेऊन सभापतींनी गजानन कांबळे यांना प्रवेश देणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. दरम्यान उपस्थित अधिकारी आणि नगरसेवकांनी मध्यस्थी करत कांबळे यांना सभागृहाबाहेर नेले. त्यानंतर स्थायी समितीचे कामकाज पुन्हा सुरू झाले. या घटनेमुळे मनपा प्रशासनातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
