रोटरी क्लब ऑफ अकोटतर्फे ‘युथ मंथ’ उत्साहात साजरा

युथ मंथ

अकोट :
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे व त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अकोटच्या वतीने शहरातील लाल बहादुर शास्त्री ज्ञानपीठ व ज्युनिअर महाविद्यालयात ‘युथ मंथ’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘ज्ञानसागर’ या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

युथ मंथच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच एकल कला सादरीकरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता, कल्पकता व कलात्मक कौशल्य प्रभावीपणे सादर केले. रंगीबेरंगी रांगोळ्या, विचारप्रवर्तक निबंध, आकर्षक चित्रकला आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विवेकवर्धिनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर, सचिव भरत पेठे, व्यवस्थापक रमेश टावरी, माजी अध्यक्ष सुरेश खोटरे व कोषाध्यक्ष कुंजीलाल कोठारी उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ अकोटचे अध्यक्ष इंजि. रवि पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव वाढीस लागते, असे प्रतिपादन केले.

Related News

विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या युथ मंथ प्रकल्पाचे प्रमुख म्हणून श्याम शर्मा यांनी जबाबदारी पार पाडली.

यावेळी रोटरी क्लब ऑफ अकोटचे सचिव डॉ. नवेश मोहता, राजकुमार गांधी, संतोष इस्तापे, शिरीष पोटे, इंजि. प्रमोद लहाने, उद्धव गणगणे, दीपक कतोरे यांच्यासह क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन विशाल सर, सपना मॅडम व प्राजक्ता मॅडम यांनी केले. साउंड व्यवस्थेची जबाबदारी आकाश गोरले, रवि टिकार व हरिओम भगत यांनी सांभाळली.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत विद्यार्थ्यांसाठी हा युथ मंथ एक प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.

read also :  https://ajinkyabharat.com/mumbais-power-kunachi-corporator/

Related News