समृद्धी महामार्गावर सराफा व्यापाऱ्यास लुटले..

  • समृद्धी महामार्गावर सराफा व्यापाऱ्यास लुटले.. पावणे पाच किलो सोन्याचा ऐवज लंपास सराफा व्यापाऱ्यास लुटले

अकोला: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी एका सराफा व्यापाऱ्याच्या पावणे पाच किलो सोन्याचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या सराफा व्यापाऱ्याला गाडी चालकाने विश्वासघात करून दरोडेखोरांची मदत केल्याने. व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे पोळा सणाची तयारी सुरू असताना दुसरीकडे सायंकाळी समृद्धी महामार्गावर घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे महामार्गाची सुरक्षितता ऐरणीवर वर आली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या महामार्गावर आता लुटमारीच्या घटना वाढू लागल्याने महामार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .ही घटना पोलिसांसाठी मोठे आव्हान देणारी ठरत आहे.

घटनेची हकीकत अशी

व्यापारी अनिल शेशमलजी जैन चौधरी (रा. मुंबई) हे खामगाव येथून मुंबईकडे सोन्याचा ऐवज घेऊन निघाले होते. त्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका खाजगी इनोव्हा गाडीतून प्रवास सुरू केला . यादरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास फरदापूर टोलनाका ओलांडल्यानंतर गाडी चालकाने अचानक पोटदुखीचे कारण सांगून गाडी रस्त्याच्या बाजूला थांबविली. गाडी थांबवताच पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनातून चार ते पाच अज्ञात दरोडेखोर उतरले. त्यांनी सराफा व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मिरचीपूड डोळ्यात फेकली.
या दरम्यान गाडी चालकानेच सोन्याने भरलेली बॅग उचलून थेट दरोडेखोरांच्या ताब्यात दिली. आणि काही क्षणातच दरोडेखोरांनी आपली गाडी सुरू करून मालेगावच्या दिशेने पलायन केले. व्यापाराला कळण्याआधीच चालकासह दरोडेखोर पावणे पाच किलो सोने घेऊन फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दरोडेखोरांची गाडी मालेगाव टोलनाका ओलांडून पातूरच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली. मात्र, पातूरच्या जंगलाजवळ दरोडेखोरांनी आपली गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे