यात्रा चौकात भरदिवसा धक्कादायक घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोट (प्रतिनिधी)
अकोट शहरातील यात्रा चौकात भरदिवसा एका माजी सैनिकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल तीन लाख रुपये रोख व महत्त्वाची
कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली.
Related News
या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अवधूत कॉलनीतील रहिवासी माजी सैनिक अशोक हरिश्चंद्र डहाके यांनी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून
वैयक्तिक कारणासाठी तीन लाख रुपये काढले होते. त्यांनी ही रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून यात्रा चौकातील एका
हॉटेलसमोर समोसे घेण्यासाठी थांबले असता, डिक्कीतून तीन लाख रुपये रोख, मोबाईल फोन, चेक बुक,
ओळखपत्र व इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
डहाके यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरटे पल्सर दुचाकीवरून पसार झाले.
त्यानंतर डहाके यांनी तत्काळ यात्रा चौक पोलिस चौकीत धाव घेतली, मात्र चौकी बंद असल्याचे दिसून आले.
त्यांनी लगेचच शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला असून, डीबीचे पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे,
हेकॉं गणेश सोळंके, नरेंद्र जाधव व विपुल सोळंके यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे.
भरवर्दळीच्या चौकात पोलिस चौकी बंद
घटना घडली त्या वेळेस यात्रा चौकातील पोलिस चौकी बंद होती.
हे ठिकाण भाजी बाजार, व्यापारी प्रतिष्ठान, वर्दळ आणि वाहतुकीचा मुख्य केंद्र आहे,
त्यामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
पोलिस वारंवार नागरिकांना “डिक्कीत पैसे किंवा मौल्यवान वस्तू ठेवू नका” असे आवाहन करतात.
मात्र, या सूचनेचे पालन न झाल्याने असे प्रकार घडत आहेत.
अशा प्रकारामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील जबाबदारीची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
डहाके यांची प्रतिक्रिया
“दोन जण दुचाकीवर होते. त्यापैकी एकाने काळा शर्ट घातलेला होता. त्यांनी डिक्कीतून पिशवी काढून पळ काढला.
मी आरडाओरड केली, पण तोपर्यंत ते पसार झाले. पिशवीत माझे चेक बुक, मोबाईल,
बँक पासबुक, ओळखपत्र, कागदपत्रे आणि तीन लाख रुपये रोख होते.”
— अशोक डहाके, माजी सैनिक, अकोट
