मूर्तिजापूरात अटल फाउंडेशनतर्फे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव उत्साहात साजरा

अटल

मूर्तिजापूर | प्रतिनिधी

मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अटल फाउंडेशन व ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा भव्य जाहीर सत्कार तसेच अटल फाउंडेशनच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास शहर व तालुक्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंह व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश राजे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेश महामंत्री विष्णू लोडम व अकोला जिल्हाध्यक्षा सौ. रूपाली केतन तिडके यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उत्सव नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.

Related News

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित नगराध्यक्ष हर्षलदादा साबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून पाटील समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष पप्पू पाटील तिडके, अटल फाउंडेशनचे प्रदेश उपाध्यक्ष महेश आप्पा शेटे, उद्योजक प्रशांत हजारी, अविनाश बांबल सर आणि राजेंद्र इंगोले उपस्थित होते.

या प्रसंगी सुप्रसिद्ध कवी व गायक कल्पक कांबळे आणि माया दवंडे यांनी जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित भक्तीगीते सादर केली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले आणि संपूर्ण परिसर भक्तीमय व प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.

कार्यक्रमात मुर्तिजापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. सर्व नगरसेवकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून एकोप्याचा संदेश दिल्यामुळे शहरात सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण झाले. लोकप्रतिनिधींनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

यासोबतच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रा. एल. डी. सरोदे (राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार) तसेच मिलिंद इंगळे (महाराष्ट्र भूषण पुरस्कार) यांचा विशेष गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे समाजातील सेवाभावी कार्याला चालना मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान अटल फाउंडेशनच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये नंदिनी प्रेम शर्मा यांची अकोला जिल्हा सचिव, श्याम डोंगरे यांची जिल्हा सरचिटणीस, राहुल बसवेश्वर आप्पा मिटकरी यांची तेल्हारा तालुका अध्यक्ष आणि एजाज अहमद यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेवक विष्णू लोडम यांनी केले, तर सूत्रसंचालन शिवकन्या शिवानी श्रीराव यांनी प्रभावीपणे पार पाडले. या सोहळ्याला साहेबराव जळमकर, कमलाकर गावंडे, भाजपा शहराध्यक्ष राम जोशी, रितेश सबाजकर, मुन्नाभाऊ नाईकनवरे, दिनेश दुबे यांच्यासह मूर्तिजापूर शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेने पार पडला.

Related News