स्वच्छ-हरीत विद्यालय रेटिंग मूल्यमापनासाठी बोर्डी शाळेला भेट

बोर्डी

शिक्षणाधिकाऱ्यांकडून अभिनव उपक्रमांचे कौतुक

अकोट :अकोट तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ आदर्श शाळा, बोर्डी येथे स्वच्छ व हरीत विद्यालय रेटिंग (एसएचव्हिआर) कार्यक्रमांतर्गत शाळेच्या मूल्यमापनासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान शाळेत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम तसेच शैक्षणिक गुणवत्तेची सखोल तपासणी करण्यात आली.

या मूल्यमापन प्रक्रियेसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रतनसिंग पवार, विस्तार अधिकारी श्याम राऊत (जिल्हा परिषद, अकोला), गट शिक्षणाधिकारी मधुकर सूर्यवंशी (पंचायत समिती, अकोट), विस्तार अधिकारी गजानन सावरकर तसेच कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर लहाने (समग्र शिक्षा अभियान, अकोला) उपस्थित होते. अधिकाऱ्यांचे शाळा व्यवस्थापन व शिक्षकवृंदाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

एसएचव्हिआर कार्यक्रमांतर्गत एकूण ६० मुद्द्यांवर आधारित शाळेचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये शाळेची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालयांची स्थिती, हात धुण्याच्या सवयी, कचरा व्यवस्थापन, हरित उपक्रम, वृक्षारोपण, शैक्षणिक वातावरण तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग या विविध बाबींचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी प्रत्येक मुद्द्याची बारकाईने पाहणी करून आवश्यक नोंदी घेतल्या.

Related News

शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी काही वर्गांना प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित तसेच सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानपातळीची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे, आत्मविश्वास आणि सहभाग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांमधील स्वच्छतेविषयीची जाणीव व पर्यावरणपूरक विचारसरणीही उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी शाळेत राबविण्यात येणाऱ्या अभिनव उपक्रमांची विशेष पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या डायनिंग हट आणि अ‍ॅक्टिव्हिटी हबला अधिकाऱ्यांनी भेट दिली. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वच्छतेच्या सवयी तसेच सामूहिक सहभाग वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच शाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकविण्यात येणारा भाजीपाला, अभिनव परसबाग, शेंदुराचे झाड तसेच विविध औषधी वनस्पतींची लागवड पाहून अधिकाऱ्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शेती, पर्यावरण व आरोग्याविषयी ज्ञान मिळत असल्याचे त्यांनी कौतुकास्पद ठरविले.

शाळेत राबविण्यात येणारे स्वच्छता अभियान, प्लास्टिकमुक्त परिसर, कचऱ्याचे वर्गीकरण, वृक्षसंवर्धन तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी घेतलेले प्रयत्न पाहून अधिकाऱ्यांनी शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी अधिकाऱ्यांनी शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत स्वच्छ व हरीत विद्यालय उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवावा, असे मार्गदर्शन केले. या भेटीमुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व व्यवस्थापनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related News