अकोट (दि. ११ फेब्रुवारी २०२६): स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने पाटसुल रेल्वे परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शैक्षणिक भेट देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय रुजवणे, आर्थिक साक्षरता वाढवणे आणि शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. के. नन्नावरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
उपक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. एम. के. नन्नावरे यांनी शैक्षणिक भेटीमागील उद्देश स्पष्ट करत ‘दैनंदिन जीवनातील अर्थशास्त्र’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पैशांचे योग्य नियोजन, बचतीचे महत्त्व आणि लहानपणापासून आर्थिक शिस्त अंगीकारण्याची गरज याबाबत त्यांनी सोप्या व उदाहरणांसह मार्गदर्शन केले. विशेषतः पिगी बँकच्या माध्यमातून बचत कशी करावी, छोट्या रकमेतून मोठी बचत कशी उभी राहू शकते याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले. त्यांच्या संवादात्मक शैलीमुळे शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्नही विचारले.
या भेटीदरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल क्लासरूमची पाहणी केली. ग्रामीण भागातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण दिले जात असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शासनाच्या पोषण आहार योजनेची माहिती घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुविधांबाबत जाणून घेतले. शहरी आणि ग्रामीण शिक्षणपद्धतीतील बदल व साम्य याबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
Related News
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधत त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. उच्च शिक्षणाच्या संधी, करिअरच्या विविध वाटा आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज यावर त्यांनी मार्गदर्शन केले. या संवादामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
सहाय्यक अध्यापक श्री विजय पळसोदकर यांनी अशा शैक्षणिक भेटींचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमधील दरी कमी करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते आणि परस्परांकडून शिकण्याची संधी मिळते.” त्यांनी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या या पुढाकाराचे कौतुकही केले.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक निशिकांत भुरे, संध्या पांडे, गंगा बाळापुरे, शिवाजी शेळके यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मेहुल व्यास यांनी आभार प्रदर्शन केले.
या शैक्षणिक भेटीच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र विभागातील ओम ठोंबरे, वैष्णवी बैतुले, श्रावणी वानखडे, अनुष्का टेरसे, प्राची बैतुले, प्राची चांदूरकर, क्षितिजा खंडार, राधिका देशमुख आणि नेहा राऊत या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे मिळालेच, शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली.
