मुर्तीजापुर येथील श्री डॉ. आर. जी. राठोड कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी मशरूम लागवडीचे विशेष प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले. बदलत्या शेती पद्धतींमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक व उत्पन्नवर्धक पर्यायांची माहिती मिळावी तसेच कौशल्याधारित शिक्षणाला चालना मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शेतीसोबत जोडधंद्याच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. पूनम आर. गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांना मशरूम लागवडीचे सैद्धांतिक ज्ञान देतानाच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. मशरूम उत्पादनासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया, योग्य तापमान, आर्द्रता, स्वच्छता आणि कच्च्या मालाची निवड याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. विशेषतः विदर्भातील हवामान मशरूम लागवडीसाठी कसे अनुकूल आहे आणि कमी जागेत व कमी खर्चात हा व्यवसाय कसा सुरू करता येतो, यावर त्यांनी भर दिला.
यावेळी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. बी. काळबांडे तसेच ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. डॉ. अमित तानकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रात नव्या संधी शोधण्याचे आवाहन केले. आजच्या नवीन शिक्षण पद्धतीत स्किल डेव्हलपमेंटला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे अशा प्रशिक्षणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास मदत होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Related News
मशरूमला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. प्रथिने, फॉलिक ऍसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समृद्ध स्रोत असल्याने मशरूम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. मधुमेह आणि लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यासाठी ते उपयुक्त असून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत होते. त्यामुळे अन्नपदार्थांमध्ये मशरूमचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना ऑइस्टर मशरूमच्या लागवडीबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. विदर्भातील तापमान या प्रकारच्या मशरूमसाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात आले. गहू आणि सोयाबीनच्या कुटाराचा प्रभावी वापर करून मशरूम उत्पादन कसे करता येते, याची माहिती देण्यात आली. बीज तयार करणे, पिशव्यांमध्ये भरणे, नियंत्रित वातावरण ठेवणे आणि योग्य वेळी काढणी करणे या सर्व टप्प्यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने पाहिले.
मूर्तीजापुर व परिसरातील ग्रामीण भागात शेतीसोबत मशरूम लागवड हा फायदेशीर जोडधंदा ठरू शकतो. वाढती मागणी लक्षात घेता शेतकरी आणि तरुणांनी या व्यवसायाकडे वळल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते, असेही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणादरम्यान विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
या कार्यक्रमात प्रयोगशाळेतील श्री ए. जी. सोळंके यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. चर्जन यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच श्री गोविंदसिंह राठोड शिक्षण प्रसारक मंडळ, दहातोंडाच्या अध्यक्षा श्रीमती दमयंतीबाई राठोड आणि संस्थेचे सचिव डॉ. ए. आर. राठोड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना विकसित होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
