मुंबई, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापले असून, आता स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Related News
काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं होतं की,
“शेतकरी कर्ज घेतात आणि त्यातून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर खर्च करतात.
” तसेच, “भिकारी एक रुपया घेत नाही, पण आम्ही एक रुपयात पीक विमा देतो,”
असे वादग्रस्त विधान देखील त्यांनी याआधी केले होते. या विधानांमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
विरोधकांनी याला मुद्दा बनवत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
यानंतर कोकाटेंनी जाहीर माफी मागितली होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांना समज दिली होती.
मात्र, यावर राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अजितदादांनी समज दिल्यानंतर ही
माणिकराव कोकाटेंचं बेताल वक्तव्य थांबत नाही. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवणं हे शेतकऱ्यांच्या अपमानासारखं आहे.
त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे.”
त्याचप्रमाणे कांद्याच्या निर्यातीसंदर्भातही शेट्टींनी कोकाटेंना सुनावलं.
“जे आयात शुल्क त्यांनी आत्ताच शून्यावर आणलं, ते जर दोन महिने आधी केलं असतं,
तर शेतकऱ्यांचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात विकला गेला असता,” असं ते म्हणाले.
अजित पवारांवरही निशाणा:
राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधला.
“अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना असूनही
त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं खोटं आश्वासन दिलं. हे सरळसरळ गंडवणं आहे,” असा आरोप शेट्टींनी केला.
“राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे, असं सांगितलं जातं, पण तरीही ८६ हजार कोटींचे ‘शक्तीपीठ’ सारखे प्रकल्प राबवले जात आहेत.
हे दुहेरी धोरण शेतकऱ्यांशी विश्वासघात आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
शेट्टींनी स्पष्ट इशारा दिला की, “आता आम्ही थेट कार्यक्रमात जाऊन महायुतीच्या नेत्यांना जाब विचारणार आहोत.
” प्रहार जनशक्ती पक्षानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील
आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सरकारसमोर दबाव वाढल्याचं चित्र आहे.
