डोणगावपासून जवळ असलेल्या आरेगाव माळ परिसरात गुरुवार, २ जानेवारीच्या रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी होऊन एका अल्पवयीन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी वाहन चालवता येत नसल्याची माहिती असूनही अल्पवयीन मुलाच्या ताब्यात ट्रॅक्टर दिल्याबद्दल वाहन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव ऋषिकेश किरण भुतेकर (वय १७ वर्षे ७ महिने) असे असून तो एमएच २८ टी ८७०९ क्रमांकाचा ट्रॅक्टर भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. आरेगाव रस्त्यावर ट्रॅक्टर रोडखालील नाल्यात घसरून पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून ऋषिकेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी मृताच्या वडिलांनी दत्ता पुंजाजी भुतेकर (वय ४२) यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पवन अरुण काळे (रा. डोणगाव) याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related News
अवैध गौण खनिज वाहतुकीचा संशय, पोलिस व महसूल विभागावर प्रश्न
या घटनेनंतर डोणगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक चर्चेनुसार, आरेगाव रस्त्यावरील एका बांधकामस्थळी गौण खनिज नेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टर सुरू होते. काही ठिकाणी कोण आधी पोहोचतो यासाठी ट्रॅक्टर चालकांमध्ये शर्यती लावल्या जात असल्याचीही चर्चा आहे.
विशेष म्हणजे, या अवैध वाहतुकीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर चालक म्हणून केला जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची हालचाल लक्षात ठेवण्यासाठी काही युवक रात्रीभर मोटारसायकलवर फिरून लोकेशन देत असल्याची माहितीही समोर येत आहे.
CCTV फुटेज तपासण्याची मागणी
डोणगाव गावातील विविध भागांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रात्रीच्या वेळी अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने स्पष्टपणे दिसून येतात, असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या फुटेजची सखोल तपासणी करून:
मृत अपघाताच्या वेळी ट्रॅक्टरसोबत आणखी वाहने होती का?
अल्पवयीन चालकासोबत इतर कोण सहभागी होते का?
उत्खनन व वाहतुकीचा संपूर्ण साखळीतील सूत्रधार कोण?
याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाने कठोर कारवाईची गरज
मागील काही दिवसांपासून तहसीलदार व अप्पर तहसीलदार डोणगाव परिसरात भेट देत असले तरी, त्यांच्या हालचालींची माहिती माफियांपर्यंत पोहोचत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बांधकामस्थळे व लेआउट्सची प्रत्यक्ष पाहणी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.या दुर्घटनेमुळे अवैध गौण खनिज माफियागिरी, अल्पवयीनांचे शोषण आणि प्रशासनाची कार्यक्षमता याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
