Nagpur News : पिचकारीचा राग, आजीकडून नातवावर उकळते पाणी; नागपुरात चार वर्षांचा चिमुकला ४५ टक्के भाजला

पिचकारी

नागपूर : रंग, आनंद आणि उत्साहाचा सण मानल्या जाणाऱ्या होळी–धुळवडीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पिचकारीने रंग उडवल्याच्या किरकोळ कारणावरून संतापलेल्या आजीने आपल्या चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी फेकल्याने तो गंभीररीत्या भाजल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कोराडी परिसरात घडली असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम हरीश वांगे (वय ४) असे जखमी बालकाचे नाव आहे. ओम हा आपल्या आई-वडिलांसह कोराडी येथील आरामशिन परिसरातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये राहत होता. मंगळवारी सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास तो घराबाहेर इतर मुलांसोबत पिचकारीने रंग खेळत होता. होळीच्या सणामुळे परिसरात मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

याचदरम्यान ओमची चुलत आजी सिंधू ठाकरे या घराच्या अंगणातून जात होत्या. त्यांनी होळीच्या लाकडावर पाणी गरम केले होते आणि ते पाणी बादलीत घेऊन त्या घराच्या आत जात होत्या. त्याचवेळी खेळाच्या नादात असलेल्या ओमने पिचकारीतील रंग त्यांच्या अंगावर उडवला.

Related News

मात्र या छोट्याशा प्रकारामुळे सिंधू ठाकरे संतापल्या. रागाच्या भरात त्यांनी हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट ओमच्या अंगावर फेकली. अचानक अंगावर उकळते पाणी पडताच ओम वेदनेने किंचाळू लागला. त्याच्या कमरेखालच्या भागाला गंभीर भाजल्या गेल्या. मुलाचा आरडाओरडा ऐकताच घरातील इतर सदस्यांनी तातडीने धाव घेतली.

घरच्यांनी लगेचच त्याच्या अंगावर थंड पाणी टाकून भाजलेल्या जागा शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र उकळते पाणी पडल्याने त्याला मोठ्या प्रमाणात भाजल्या गेल्या होत्या. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने नागपूरमधील नेल्सन या खाजगी रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत ओम सुमारे ४५ टक्के भाजल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. व्हिडिओमध्ये काळ्या साडीत असलेली महिला हातात बादली घेऊन अंगणातून जाताना दिसते. त्यावेळी लहान मुलगा पिचकारीने रंग उडवताना दिसतो. त्यानंतर संतापलेल्या महिलेनं बादलीतील गरम पाणी थेट मुलाच्या अंगावर ओतल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पाणी अंगावर पडताच मुलगा वेदनेने उड्या मारत किंचाळताना दिसतो.

यानंतर घरातील इतर महिलांनी धावत येऊन मुलावर थंड पाणी टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही या फुटेजमध्ये दिसून येते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे जखमी झालेला ओम हा त्या महिलेच्या मुलीचा मुलगा आहे. तो आई-वडिलांसह आजीकडेच राहत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईबाबत तपास सुरू आहे. या घटनेमुळे होळीच्या सणाच्या दिवशीच एका निष्पाप चिमुकल्याला गंभीर जखमा झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याबाबतही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

READ ALSO :  https://ajinkyabharat.com/ind-vs-eng-semi-final-2026-5-big-pressing-issues-indias-side-is-falling-short-clear-signal-from-mane-merkel/

Related News