अकोट (प्रतिनिधी):
सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील शहापूर, जितापूर, शिवपूरसह परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी एका शेतमजुरावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने ही भीती अधिकच गडद झाली असून, शेतकरी व ग्रामस्थ आता आक्रमक भूमिकेत आले आहेत. वनविभागाने तात्काळ बंदोबस्त न केल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन व आमरण उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
शहापूर, जितापूर माऊली, कासोद, बोर्डी, पिंप्री, चरोड, बेलुरा, एदलापूर, खैरखेड, लाडेगाव, मक्रमपुर आणि उमरा या गावांमध्ये वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वी हुसेन मोहताप सुरतने (वय ४८) या शेतमजुरावर वाघाने अचानक हल्ला केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, या हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. विशेष म्हणजे, वाघाचा वावर केवळ रात्रीपुरता मर्यादित न राहता दिवसाढवळ्याही शेतशिवारात दिसून येत असल्याने शेतात जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या भीतीमुळे शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. महिलांना व शालेय विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणेही धोकादायक वाटत असून, ग्रामस्थ सतत दहशतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत.
Related News
या पार्श्वभूमीवर बेलुरा गावच्या सरपंच दीपिका राम मंगळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात बाधित गावांच्या परिसरात तात्काळ रात्रीची गस्त वाढवावी, हिंसक वाघासाठी पिंजरे लावावेत, शेतमजुरावर झालेल्या हल्ल्याबाबत तात्काळ आर्थिक व वैद्यकीय मदत द्यावी, तसेच महिलां व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक तैनात करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी सरपंच दीपिका मंगळे, राम मंगळे, पांडुरंग तायडे (प्रमुख, एकलव्य बचाव पथक), सुभाष सुरतने, हर्षवर्धन देशमुख, अंकुश सुरतने, सोनाजी बारे, कैलास भारसाकडे, कैलास पवार, आकाश सोलकर, रुपेश भारसाकडे, दिनेश मोरे, दिनेश भास्कर, राजपाल सोलकर, जयेश मंगळे, मुकेश सुरतने यांच्यासह परिसरातील शेतकरी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना आदिवासी तालुकाप्रमुख सुभाष सुरतने यांनी तीव्र शब्दांत इशारा देताना सांगितले की, “वन्यप्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा आदिवासी बांधवांच्या वतीने वनविभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
तर सामाजिक कार्यकर्ते राम मंगळे यांनी म्हटले की, “परिसरात सातत्याने घटना घडत असतानाही वनविभाग सुस्त आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागेल.”
एकीकडे वन्यप्राणी संरक्षण आणि दुसरीकडे मानवी जीविताचा प्रश्न, अशा कात्रीत अडकलेल्या या परिसरात वनविभागाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/talukyat-structure-liquor-factory-demolished/
