पातूर (तालुका प्रतिनिधी):
नवीन वर्षाचे स्वागत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. रविवारी मध्यरात्री अकोला राज्य उत्पादन शुल्क विभागाने पातूर तालुक्यातील चिचखेड शिवारात छापा टाकून बनावट दारूचा मोठा कारखाना उद्ध्वस्त केला. या धडक कारवाईत ‘टॅंगो’ आणि ‘रॉकेट संत्रा’ या नावाने तयार केली जाणारी बनावट दारू, त्यासाठी वापरले जाणारे साहित्य, वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण अंदाजे ४० ते ५० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत १,१५० पेक्षा अधिक बॉक्स बनावट दारू, एक ट्रॅक्टर-ट्रॉली, दुचाकी वाहन तसेच मोठ्या प्रमाणात रसायने, रिकाम्या बाटल्या, लेबल्स आणि झाकणांचा समावेश आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विषारी दारूचा पुरवठा करणाऱ्या या कारखान्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता.
टँकरमधून स्पिरिट चोरी; जीवघेणा व्यवसाय
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पातूर–मालेगाव मार्गावरून जाणाऱ्या स्पिरिट वाहतूक करणाऱ्या टँकर्समधून चोरट्या मार्गाने स्पिरिट काढले जात होते. त्याच स्पिरिटचा वापर करून चिचखेड शिवारात बनावट दारू तयार केली जात होती. या कारखान्यातून दररोज ५०० ते ६०० बॉक्स दारू तयार करून ती पातूर तालुक्यासह अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच शेजारील तालुक्यांमध्ये पुरवली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
ही दारू अत्यंत निकृष्ट आणि विषारी असल्याने ती सेवन केल्यास गंभीर आजार, अंधत्व किंवा मृत्यू होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांमध्ये यामुळे तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याआधी घडलेल्या अचानक मृत्यूंच्या घटनांचा या अवैध दारूशी काही संबंध आहे का, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
उत्पादन शुल्क विभागाची काटेकोर कारवाई
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. छाप्याचे नेतृत्व निरीक्षक प्रमोद कांबळे यांनी केले. त्यांच्या पथकात विशाल बांबलकर, सुभाष गावंडे, योगेश सरप यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. मध्यरात्री अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई राबविण्यात आली, ज्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.
कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली. जप्त केलेला मुद्देमाल अधिकृत पंचनाम्यानुसार ताब्यात घेण्यात आला असून, संबंधित शेतमालक, वाहनमालक आणि या व्यवसायामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी महसूल विभाग आणि आरटीओ विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
स्थानिक पोलीस प्रशासनावर संशयाची सुई
इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला हा अवैध दारू व्यवसाय स्थानिक पातूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या नजरेत कसा आला नाही, हा प्रश्न आता जनसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. चिचखेड शिवारात दीर्घकाळ हा कारखाना सुरू असल्याची चर्चा असूनही पोलिसांना याची माहिती नसणे, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
या कथित दुर्लक्षामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, काही नागरिकांनी तर पोलीस–दारू माफिया साटेलोट्याचीही शक्यता व्यक्त केली आहे. जर या प्रकरणात पोलिसांचे अपयश किंवा सहभाग आढळून आला, तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
परवानाधारक व्यावसायिकांवर परिणाम
या अवैध दारू व्यवसायाचा फटका अधिकृत परवानाधारक दारू विक्रेत्यांनाही बसत आहे. बनावट आणि स्वस्त दारू बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने अधिकृत दुकानदारांच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. शासनाचा महसूल बुडत असून, त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याशीही खेळ केला जात आहे.
सखोल चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष चौकशी करून अवैध दारू व्यवसायामागील सर्व सूत्रधारांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे. केवळ कारखाना उद्ध्वस्त करून थांबू नये, तर या साखळीतील प्रत्येक दुवा – स्पिरिट चोरी, वाहतूक, वितरण आणि विक्री – यांचा तपास करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला असला, तरी भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस व प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
