मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; 3 वाहनांच्या धडकेत 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 3 गंभीर जखमी
महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात घडला. खंडाळा घाटातील फूड मॉल परिसरात तीन वाहनांच्या साखळी धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक जवळपास दीड तास ठप्प झाली होती. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की संबंधित वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने तांदूळ, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारा ट्रक खंडाळा घाटातील उतारावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वेगात असलेल्या ट्रकने पुढे जाणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रक आणि कंटेनर दोन्ही महामार्गावर उलटले.
Related News
या अपघातात ट्रकचालक अरविंद कुमार रंगाराव अल्लू (वय 50) आणि क्लीनर शिवा अप्पाराव भुक्का (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही आंध्र प्रदेशातील येल्लूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एक्स्प्रेसवे अपघातानंतर आणखी एक धडक
ट्रक आणि कंटेनर उलटल्यानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात साहित्य विखुरले. त्याचवेळी मागून येणाऱ्या इर्टिगा कारचालकाला रस्त्यावर घडलेल्या अपघाताचा अंदाज आला नाही. परिणामी इर्टिगा कार थेट अपघातग्रस्त वाहनांवर आदळली.
या दुसऱ्या धडकेत कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये सौरभ मुकिंदा सस्ते (वय 26), लीलाबाई किसन सस्ते (वय 76) आणि महेंद्रकुमार पॉल (वय 39) यांचा समावेश आहे. हे तिघेही रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रहिवासी आहेत.
घटनास्थळी मदतकार्यासाठी धाव
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस आणि विविध आपत्कालीन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. महामार्ग पोलीस निरीक्षक विनोद मालवे, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील, उपनिरीक्षक सरोदे, प्रभाकर मोहिते, पोलीस निरीक्षक सचिन हिरे, फौजदार अमोल धायगुडे आणि कौशिक फेंगडू यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले.
देवदूत आपत्कालीन पथक, डेल्टा फोर्स आणि आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
महामार्गावर विखुरले तांदूळ आणि खाद्यतेल
अपघातग्रस्त ट्रकमध्ये तांदळाच्या गोण्या, खाद्यतेलाचे डबे, बॉक्स आणि इतर माल होता. धडकेनंतर हे सर्व साहित्य महामार्गावर विखुरले. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व चार मार्गिका पूर्णपणे बंद झाल्या.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माल पसरल्यामुळे वाहतूक व्यवस्थापन करणे अत्यंत कठीण झाले होते. अनेक वाहनचालकांना दीर्घकाळ वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.
