अकोल्यातील सिटी हॉस्पिटलमध्ये भीषण आग; ICU मधील 8 रुग्णांची सुखरूप सुटका, परिसरात खळबळ

सिटी हॉस्पिटल

अकोला शहरातील रामदास पेठ परिसरातील सिटी हॉस्पिटलमध्ये आज अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये काही रुग्णांवर उपचार सुरू असतानाच धूर पसरू लागल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये घबराट निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले.

जवानांनी आतापर्यंत सुमारे आठ रुग्णांना सुखरूप बाहेर काढले असून इतर रुग्णांनाही सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रुग्णालय प्रशासन, पोलिस आणि आरोग्य विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाहेर काढण्यात आलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून आगीमागील कारणांचा तपासही सुरू करण्यात आला आहे.

Related News

Related News