Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस! पालघरमध्ये पूरस्थिती गंभीर, 16 गावांचा संपर्क तुटला; शाळांना सुट्टी, पुढील 48 तास धोक्याचे
Maharashtra Weather Update :Maharashtra पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. Maharashtra मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या भागांसह राज्याच्या विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. काही भागात नदी-नाले दुथडी भरून वाहत असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. विशेषतः पालघर जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान विभागाने आजही राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, यवतमाळ, अकोला आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पालघरमध्ये पूरस्थिती गंभीर; 16 गावांचा संपर्क तुटला
पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.
Related News
सारणी-उर्से-ऐना या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचले आहे. त्यामुळे उर्सेसह परिसरातील जवळपास 15 ते 16 गावपाड्यांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सूर्या नदीच्या काठावरील सुमारे 64 ते 65 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Maharashtra : पालघरमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
पालघर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय अंगणवाड्यांनाही सुट्टी देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे काही भागांमध्ये वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.
डहाणू ते विरार लोकल सेवा देखील पावसामुळे प्रभावित झाल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत रात्रभर पाऊस; अनेक भागांत पाणी साचले
मुंबई आणि उपनगरांमध्येही रात्रभर पावसाचा जोर कायम होता. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बोरिवली, अंधेरी, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल, भिवंडी आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दिवसभरही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मात्र, या पावसामुळे मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांपैकी तानसा जलाशय ओसंडून वाहू लागला आहे. यापूर्वी विहार आणि तुळशी तलावही भरले होते. त्यामुळे मुंबईतील सातपैकी तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सर्व सात जलाशयांमधील एकत्रित पाणीसाठा एकूण क्षमतेच्या सुमारे 62 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईवर निर्माण होणाऱ्या पाणीकपातीचे संकट काही प्रमाणात टळण्याची शक्यता आहे.
Maharashtra : पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट
राज्यातील पावसाचा सर्वाधिक जोर घाटमाथ्याच्या भागात राहण्याची शक्यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील नागरिकांनी आणि पर्यटकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 48 तास राज्यातील काही भागांसाठी महत्त्वाचे ठरणार असून पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
वारणा धरण 75 टक्क्यांहून अधिक भरले
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा-चांदोली खोऱ्यात आणि पाथरपुंज परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. वारणा धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे.
गुरुवारी 23 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत वारणा धरण सुमारे 75.13 टक्के भरले असून धरणातील एकूण पाणीसाठा 25.84 टीएमसी इतका झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Maharashtra : मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची हजेरी
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे शेतीला काही प्रमाणात दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांना पिकांसाठी आवश्यक पाणी मिळण्यास मदत होत आहे.
दरम्यान,Maharashtra राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर पुढील 48 तास कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, पुराच्या पाण्यातून प्रवास करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि स्थानिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा.
