ऑपरेशन प्रहार अंतर्गत माना पोलिसांची मोठी कारवाई

ऑपरेशन प्रहार

माना (ता. मुर्तिजापूर) 

अवैध कत्तल आणि गोवंशीय प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत माना पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेले पाच गोवंशीय बैल सुखरूप मुक्त केले आहेत. या प्रकरणी अनोळखी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई दि. १८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ०४.१० ते ०४.५० वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलीस स्टेशन माना हद्दीतील ग्राम माना येथील इदगाहच्या मागील बाजूस गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. सदर ठिकाणी कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांना अमानुष पद्धतीने ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Related News

पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी पाहणी केली असता पाच गोवंशीय बैल आखूड दोराने अत्यंत वेदनादायक अवस्थेत बांधून ठेवलेले आढळून आले. जनावरांना हालचालही करता येणार नाही, अशा स्थितीत ठेवण्यात आले असून त्यांच्यावर स्पष्टपणे निर्दय वागणूक दिल्याचे निदर्शनास आले. कत्तलीच्या उद्देशानेच ही जनावरे ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.

या प्रकरणी पोलीस स्टेशन माना येथे अप. क्र. २०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५, ९, ११ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम १९६० मधील कलम ११ (१)(अ)(फ)(ह)(आय) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सध्या आरोपी अज्ञात असून त्याचा शोध सुरू आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ५ गोवंशीय बैल जप्त केले असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख १६ हजार रुपये इतकी आहे. या जनावरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया पोलिसांकडून करण्यात आली आहे.

या यशस्वी कारवाईमुळे अवैध कत्तल करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात कडक भूमिका घेण्यात येत असल्याचा ठाम संदेश समाजात गेला आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांनी सांगितले की, गोवंश संरक्षण आणि प्राणी कल्याणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अवैध कत्तल, वाहतूक किंवा प्राण्यांवरील अन्याय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत ठाणेदार गणेश नावकार, पो.हे.कॉ. मनोहर इंगळे, मंगेश इंगोले, तसेच पो.कॉ. सुशील आठवले, प्रमोद हिवराळे, मंगेश पवार, ललित बनचरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

read also :  https://ajinkyabharat.com/at-midnight-there-was-smoke-in-the-house-here/

Related News