छगन भुजबळांचा विलक्षण राजकीय प्रवास !
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेवरुन नाराजीच्या चर्चा आणि ओबीसींचा मुद्दा
यावरुन मंत्री छगन भुजबळ वेगळ्या निर्णयाच्या तयारीत आहेत का?
Related News
अशा चर्चा सद्या सुरु आहेत.
भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा, असा सूर समता परिषदेतून निघाल्याची चर्चा आहे.
यातून महायुतीतून भुजबळ बाहेर पडणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
सुरुवातीपासूनच एक कणखर नेता अशी ओळख असलेल्या छगन भुजबळांचा
राजकीय प्रवास विलक्षण आहे!
मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण
बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी भारावून जातो,
आणि कौटुंबिक व्यवसाय सोडून राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतो,
नगरसेवक पदापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत वाटचाल करतो
अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित नाव छगन चंद्रकांत भुजबळ!
जेव्हा भुजबळ व्हीजेटीआय कॉलेजमधून
मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करत होते,
तेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन आपल्या राजकीय वाटचालीस सुरुवात केली.
त्यांच्या तळगाळातल्या लोकांशी असलेल्या संपर्कामुळे आणि
आक्रमक भाषणांमुळे ते शिवसेनेत महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले.
भुजबळ हे १९७३ मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले.
यानंतर १९७३ ते १९८४ दरम्यान महापालिकेत विरोधी पक्षनेते होते,
तर १९८५ मध्ये महापौर झाले. १९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत महापौर झाले.
शिवसेना सोडली
१९९१ मध्ये त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेशी टोकाचे मतभेद झाले
आणि कालांतराने त्यांनी याचवर्षी शिवसेना सोडली.
शरद पवारांच्या पाठिंब्याने भुजबळांनी शिवसेनेविरुद्ध बंड केले
आणि 18 आमदारांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शिवसैनिकांचा हल्ला
जेव्हा गिरणगावात केवळ शिवसेनेचा आवाज घुमायचा
आणि शिवसेनाप्रमुखांचा शब्द अंतिम असायचा अशा काळात छगन भुजबळांनी बंड पुकारले.
पक्षात बंडाळी केल्याने शिवसैनिक संतापले
आणि त्यांनी छगन भुजबळांवर हल्ला देखिल केला होता.
यात भुजबळ बचावले होते.
जेव्हा बाळा नांदगांवकर ‘जाएंट किलर’ ठरले !
आपल्या सहकाऱ्यांसोबत छगन भुजबळ यांनी काँग्रेसप्रवेश केला.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझगाव मतदारसंघातून
निवडणूक लढविणाऱ्या भुजबळांच्या विरोधात
बाळा नांदगावकर नावाच्या नवख्या तरुण शिवसैनिकाला
बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आणि या तरुणाने भुजबळांना चारीमुंड्या चीत करत
‘जाएंट किलर’ अशी उपाधी मिळवली.
सुरूवातीला काँग्रेस नंतर पवारांसोबत राष्ट्रवादीत
१९९९ मध्ये शरद पवारांनी कॉग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर
भुजबळ त्यांच्यासह राष्ट्रवादीत दाखल झाले.
भुजबळ हे राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.
१९८५ आणि १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून
त्यांची विधानसभेवर निवड झाली.
नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री. तर गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे
१९९५ पर्यंत ते मंत्री राहिले. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदी त्यांची वर्णी लागली.
१९९९ मध्ये भुजबळांना उपमुख्यमंत्रीपद
१८ ऑक्टोबर १९९९ रोजी छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली.
एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर त्यांची बिनविरोध निवड झाली.
२००४ मध्ये येवला मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले.
त्यांनी नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत
सार्वजनिक बांधकाममंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला.
यानंतर आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा
उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली.
भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मुंबईत
१ नोव्हेंबर १९९२ रोजी स्थापना केली.
भुजबळ हे राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते.
मुंबईतील पराभवानंतर नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र निवडलं
मुंबईसारख्या शहरात दोन वेळा महापौर राहिलेल्या छगन भुजबळांनी
शिवसेनेस प्रथम विधानसभेत माझगावमधून प्रवेश मिळवून दिला.
त्या भुजबळांना मुंबईतून बाहेर जावे लागले.
त्यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खेळात मुंबईबाहेर पडण्याचा निर्णय घेतला
आणि येवल्याचे प्रतिनिधीत्व स्वीकारले.
त्यातून भुजबळांच्या पुढे ‘येवल्याचे’ नाव पुढे आले.
महाराष्ट्र सदन घोटाळा
महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या संदर्भात भुजबळांनी दोन वर्षे तुरुंगात घालवावी लागली.
त्यानंतरही, शरद पवारांच्या अटळ पाठिंब्यामुळे
भुजबळांची पुन्हा एकदा 2019 मध्ये स्थापन झालेल्या
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मात्र जून २०२० मध्ये महाराष्ट्रातील राजकारणात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.
एकनाथ शिंदे यांनी राजकीय बंड पुकारले,
शिवसेनेतील आमदारांना सोबत घेऊन भाजपा सोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील त्यांचे काका शरद पवार यांच्यापासून
फारकत घेतली आणि उपमुख्यमंत्री म्हणून भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले.
मात्र शरद पवार यांचे निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
छगन भुजबळांनी देखील बंडखोरी करत भाजप-शिवसेना सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
ओबीसी समाजासाठी आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
आणि मंत्री छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत.
त्यांना नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवायची होती.
पण महायुतीत त्यांना संधी मिळाली नाही.
प्रफुल पटेलांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी ते उत्सुक होते.
पण १० दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पक्षानं संधी दिली.
त्यामुळे भुजबळांची नाराजी वाढली आहे.
भुजबळांनी स्थापन केलेल्या समता परिषदेची काल मुंबईत बैठक झाली.
भविष्याचा विचार करुन भुजबळांनी योग्य निर्णय घ्यावा.
समता परिषद त्यांच्या सोबत असेल असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
पक्षात होत असलेली भुजबळांची कोंडी पाहता समता परिषदेकडून
भुजबळांवर दबाव आणला जात असल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळे भुजबळ काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊन
महायुती सरकारमधून बाहेर पडू शकतात.
ते त्यांच्या जुन्या पक्षात परतण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळ शिवसेना (उबाठा) मध्ये परतणार असल्याची चर्चा आहे.
असे झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात
आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
Read also: फडणवीसांचा राजीनामा स्विकारणार? भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक. (ajinkyabharat.com)