कावेरी कॉलिंग फूड फॉरेस्ट परिषदेत 6000 शेतकऱ्यांचा विक्रमी सहभाग; शाश्वत शेतीसाठी वृक्षाधारित मॉडेलवर भर
तिरुचिरापल्ली येथे सद्गुरूंच्या सेव्ह सॉइल – कावेरी कॉलिंग अभियानातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘फूड फॉरेस्ट शेती आणि दक्षिण भारतीय फळ महोत्सव’ परिषदेला शेतकरी आणि नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 14 जून रोजी एसआरएम विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या या भव्य कार्यक्रमात तब्बल 6 हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले. परिषदेत अन्नवन (फूड फॉरेस्ट) आणि वृक्षाधारित शेती ही शाश्वत शेतीसाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अत्यंत प्रभावी पद्धत असल्याचे कृषी तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात विविध कृषी संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञ, यशस्वी शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होत वृक्षाधारित शेतीच्या संकल्पनेवर सविस्तर मार्गदर्शन केले. जमिनीची सुपीकता वाढविणे, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता सुधारणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि दीर्घकालीन स्थिर उत्पन्न मिळवून देणे या दृष्टीने ही शेती पद्धती अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
वृक्षाधारित शेतीबाबत वाढते आकर्षण
कार्यक्रमात बोलताना कावेरी कॉलिंगचे समन्वयक तमिळमारन यांनी सांगितले की, कावेरी कॉलिंग अभियानामुळे शेतकऱ्यांमध्ये वृक्षाधारित शेतीबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. परिणामी रोपवाटिकांमधील विविध फळझाडांच्या रोपांची मागणी झपाट्याने वाढत आहे. या पद्धतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, भूजल संवर्धनास मदत होते आणि नद्यांच्या पुनरुज्जीवनालाही हातभार लागतो.
Related News
त्यांनी सांगितले की, अलीकडेच होसूर येथे झालेल्या कृषी परिषदेदरम्यान केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे ‘अॅग्रोफॉरेस्ट्री’ या संज्ञेऐवजी ‘वृक्षाधारित शेती’ हा अधिक समर्पक शब्द वापरण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारनेही यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून या क्षेत्राला वाढती मान्यता मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीची हानी
राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. सेल्वराजन यांनी रासायनिक खतांच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांचा अतिरेक झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक कमी झाले असून मातीची उत्पादनक्षमता घटली आहे. अशा परिस्थितीत वृक्षाधारित शेती ही जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि भविष्यातील अन्नसुरक्षेसाठी महत्त्वाची ठरते.
यावेळी त्यांनी ‘कावेरी’ नावाच्या नव्या केळीच्या जातीची माहिती दिली. या केळीत सुक्रोजचे प्रमाण नसल्यामुळे ती मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केळीपासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करून शेतकरी अधिक उत्पन्न मिळवू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नारळबागेतून अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग
नारळबागांमध्ये अन्नवन विकसित करण्याबाबत कृषी तज्ज्ञ बाला मोहन यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मते, अनेक नारळबागांमध्ये मोठा भूभाग रिकामा राहतो. या जागेचा वापर बहुस्तरीय आणि बहुपीक पद्धतीसाठी केला जाऊ शकतो.
आंबा, फणस, केळी, मसाल्याची पिके आणि विविध फळझाडे यांची एकत्रित लागवड केल्यास सूर्यप्रकाशाचा अधिक कार्यक्षम वापर होतो. झाडांची गळणारी पाने आणि जैविक अवशेष मल्चिंगसाठी वापरल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे सेंद्रिय कार्बन वाढतो, सूक्ष्मजीवांचे प्रमाण सुधारते आणि जमिनीची सुपीकता वाढते. परिणामी शेतकऱ्यांना स्थिर आणि अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते.
सामान्य शेतकऱ्यापासून संयुक्त राष्ट्रांच्या गौरवापर्यंतचा प्रवास
संयुक्त राष्ट्रांकडून गौरविण्यात आलेले शेतकरी वल्लुवन यांनी आपला प्रेरणादायी प्रवास उपस्थितांसमोर मांडला. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला ते केवळ नारळाचे उत्पादन घेत होते. मात्र सेव्ह सॉइल आणि कावेरी कॉलिंग अभियानाच्या माध्यमातून त्यांना वृक्षाधारित शेतीची माहिती मिळाली.
सेंद्रिय घटकांचे महत्त्व समजून घेतल्यानंतर त्यांनी आपल्या शेतात आंबा, फणस, केळी, चिकू, जायफळ, मिरीसह तब्बल 14 विविध पिकांची लागवड केली. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढलेच, शिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली. या यशाचे श्रेय त्यांनी सद्गुरू आणि ईशा फाउंडेशनच्या मार्गदर्शनाला दिले.
शास्त्रज्ञांकडून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
परिषदेत आयसीएआर अंतर्गत कार्यरत विविध कृषी संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांनी आंबा, फणस, अवोकॅडो यांसारख्या फळपिकांच्या लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. बाजारपेठेतील संधी, उत्पादन व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग आणि निर्यात क्षमता याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.
तंजावूर येथील निफ्टेम संस्थेच्या शास्त्रज्ञांनी फळांचे मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि विपणन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. यामुळे शेतकऱ्यांना केवळ उत्पादन नव्हे तर प्रक्रिया आणि विक्रीतूनही अधिक नफा मिळवण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव
पाच राज्यांतील प्रगतशील शेतकऱ्यांनी परिषदेत आपले अनुभव मांडले. आंध्र प्रदेशातील अनंतपूरचे शेतकरी रमणा रेड्डी यांनी सपाट प्रदेशात यशस्वीपणे सफरचंद लागवड करून दाखविल्याचे अनुभव सांगितले.
कृषी शास्त्रज्ञ सरवनन यांनी पपई लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले, तर कृषी विभागाचे माजी उपसंचालक हरिदास यांनी 100 हून अधिक फणसांच्या जातींचे प्रदर्शन भरवून त्यांची वैशिष्ट्ये उलगडून सांगितली.
‘मँगो मॅन’चे विशेष आकर्षण
कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले पद्मश्री कलीम उल्लाह खान. ‘भारताचे मँगो मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान यांनी एका झाडावर तब्बल 300 आंब्यांच्या जाती विकसित करण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी आंबा लागवडीतील प्रयोग, व्यवस्थापन आणि यशाची सूत्रे शेतकऱ्यांसमोर मांडली.
फळांच्या विविध जातींचे भव्य प्रदर्शन
या प्रदर्शनात 60 हून अधिक केळीच्या जाती, 100 पेक्षा अधिक आंबा आणि फणसांच्या जाती प्रदर्शित करण्यात आल्या. तसेच आंबा, अवोकॅडो, सफरचंद, फणस आणि इतर फळझाडांची रोपे अनुदानित दरात उपलब्ध करून देण्यात आली. हजारो शेतकरी आणि नागरिकांनी या रोपांची खरेदी करत वृक्षाधारित शेतीबाबतचा उत्साह व्यक्त केला.
कावेरी कॉलिंग अभियानामुळे शाश्वत शेतीला नवी दिशा मिळत असल्याचे या परिषदेतून स्पष्ट झाले. कावेरी कॉलिंग अंतर्गत वृक्षाधारित शेती, माती संवर्धन आणि जलसंधारण याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी जागरूकता निर्माण होत आहे. तज्ज्ञांच्या मते, कावेरी कॉलिंग मॉडेलमुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्यामुळे भविष्यात देशभरातील अधिकाधिक शेतकरी या पर्यावरणपूरक आणि फायदेशीर शेती पद्धतीकडे वळण्याची शक्यता आहे.
