अकोला महानगरपालिका निवडणूक बंदोबस्तात मोठी कारवाई पोस्टे खदान हद्दीत ५० लाखांची रोख रक्कम हस्तगत

निवडणूक

अकोला | प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई पोस्टे खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून, निवडणूक काळात काळ्या पैशांच्या वाहतुकीवर मोठा आघात मानला जात आहे.

दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत खदान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की, एक इसम लाल रंगाचे टी-शर्ट आणि काळ्या रंगाची कॅप घालून मोपेड वाहनावर निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वाहतूक करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू करत निशू नर्सरी शाळेजवळ नाकाबंदी केली.

Related News

नाकाबंदी दरम्यान जुने पारसकर शोरूम ते निशू नर्सरी रोडवरून संशयित इसम मोपेडवर येताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला. पोलिसांनी स्वतःची ओळख सांगून चौकशी केली असता सदर इसमाने आपले नाव यश आनंद लालवानी (वय २७ वर्षे), रा. सिंधी कॅम्प, कच्ची खोली, अकोला असे सांगितले.

यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत त्याच्या मोपेडची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोपेडच्या पायाजवळ काळ्या रंगाची थैली आणि डिक्कीमध्ये पांढऱ्या रंगाची कापडी थैली आढळून आली. पंचासमक्ष या थैल्यांची पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चलन सापडले.

तपासात खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला –

  1. रोख रक्कम – ५०,००,००० रुपये (पन्नास लाख रुपये)

  2. टी.व्ही.एस. मोपेड वाहन (MH 30 BY 7868) – अंदाजे किंमत ७०,००० रुपये

  3. जुना वापरात असलेला मोटोरोला कंपनीचा मोबाईल फोन – किंमत अंदाजे १०,००० रुपये

असा एकूण ५०,८०,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदरची रोख रक्कम ही महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वापरण्यात येणार असल्याचा संशय असून, निवडणूक आचारसंहितेअंतर्गत चौकशीसाठी ही रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ही संपूर्ण कारवाई मा. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला, मा. रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, अकोला आणि मा. सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत  मनोज केदारे (पोलीस निरीक्षक, पोस्टे खदान) यांच्यासह पोहेकॉ निलेश खंडारे, सफौ दिनकर धुरंदर, पोहेकॉ अमित दुबे, पोका अभिमन्यु सदांशिव, पोका वैभव कस्तुरे, पोहेका प्रविण डोंगरे, पोका आकाश राठोड आणि होमगार्ड विजय घनमोडे यांनी सहभाग घेतला.

निवडणूक काळात पैशांच्या बेकायदेशीर वापरावर पोलिसांचा करडा नजर असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/shocking-incident-of-manuskeela-kalima-newborn-child-vihirit-fekalya/#google_vignette

Related News