पुणे मेट्रो प्रकल्पाला गती: CM फडणवीसांच्या घोषणेनंतर शहरातील वाहतूक सुधारेल

पुणे मेट्रो

पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी मोठा टप्पा सुरू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचा वाढता हवी असलेला आराखडा जाहीर केला आहे. सध्या पुण्यात जवळपास ३३ किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला असून, दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन आहे.

फडणवीस यांनी सांगितले की, पुण्याचा वेगाने होणारा नागरी विकास लक्षात घेता, या संपूर्ण नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करावे. सर्व मार्गांचे डीपीआर एकत्रितपणे तयार करून, भविष्यातील ग्रोथ सेंटर्स, नवीन विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे आणि वाढती उपनगरे यांचा विचार करून मेट्रोचे जाळे विकसित करावे, असे निर्देश त्यांनी महामेट्रो प्रशासनाला दिले. त्यांनी भविष्यात आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचीही ग्वाही दिली.

पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे प्रशासकीय मुख्यालय ‘मेट्रो भवन’ चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार उपस्थित होते. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रास्ताविकात पुणे मेट्रो प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

Related News

सध्या, टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या २३ किलोमीटर मेट्रो प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, १२ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन मे महिन्यात आणि उर्वरित ११ किलोमीटर मार्ग जुलै महिन्यात सुरू होईल. या दोन्ही प्रकल्पांसह पुण्यातील मेट्रो जाळे सुमारे ५६ किलोमीटरपर्यंत पोहोचणार असून, पुढील टप्प्यात आणखी ५५ किलोमीटर काम सुरू आहे आणि सुमारे ८० किलोमीटर विस्तार प्रस्तावित आहे.

पुणे मेट्रो भवनाची वैशिष्ट्ये:

  • एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,१५० चौ. मीटर.

  • भव्य स्वागत कक्ष व पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी कला स्थापना.

  • अनुभव केंद्रात पुणे मेट्रोचे जाळे व प्रकल्पाची मॉडेल्स.

  • ३१२ आसनक्षमतेचे सभागृह व बॅकअप संचालन नियंत्रण केंद्र, सिग्नलिंग व दूरसंचार सुविधा.

  • नैसर्गिक प्रकाश, ऊर्जा कार्यक्षम व पर्यावरणपूरक रचना.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नाही तर आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे. मुळा-मुठा नदीकाठावर उभारलेले हे भवन पर्यावरणाशी सुसंगत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही राज्याच्या विकासाची महत्त्वाची केंद्रे असल्याने, येथे वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, रिंग रोड, रुंद रस्ते, सेवा रस्ते, भुयारी मार्ग, पूल तसेच मेट्रोसारखे मोठे प्रकल्प राबवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली आहेत.

स्वारगेट–कात्रज, पिंपरी-चिंचवड–भक्तीशक्ती चौक, वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली, खडकवासला–खराडी, वारजे–नळस्टॉप तसेच हडपसर–सासवड व हडपसर–लोणी काळभोर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना गती देण्यात आली आहे. भविष्यात पुणे विमानतळ आणि चाकण एमआयडीसी यांनाही मेट्रोने जोडण्याचा विचार केला जात आहे. फडणवीस यांनी सांगितले की, जमिनीवर, आकाशात आणि भुयारी मार्गांद्वारे वाहतूक व्यवस्था विकसित करून पुणे शहर वाहतूक कोंडीरहित व शाश्वत बनवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/5-people-injured-15-suspects-detained-due-to-gathering-noise-in-pune-saswad-while-preparing-for-iftar/

Related News