रामापूरमध्ये घरकुल योजनेत अन्याय?, 40 वर्षांपासून राहणाऱ्या चामलाटे कुटुंबाला अजूनही घर नाही

रामापूर

रामापूर (ता. अकोट) : अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रामापूर या गट ग्रामपंचायतीत घरकुल योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण शामराव चामलाटे हे गेल्या ३० ते ४० वर्षांपासून गावात वास्तव्यास असूनही त्यांना आजपर्यंत शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे हे कुटुंब सध्या अत्यंत दयनीय परिस्थितीत जगत असून, शासनाच्या योजना खरोखर गरजूंपर्यंत पोहोचतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रामापूर गावातील रहिवासी असलेले अरुण चामलाटे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांचे कुटुंब अत्यंत साध्या परिस्थितीत जीवन जगत आहे. त्यांच्या कुटुंबात आई, पती, पत्नी आणि एक मुलगा असे चार सदस्य आहेत. मात्र राहण्यासाठी त्यांच्या नावावर सध्या सुरक्षित असे घर नाही. ते ज्या घरात राहत आहेत ते पूर्णपणे मातीचे असून अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. घराच्या भिंती अनेक ठिकाणी कोसळल्या असून छप्पर देखील ढासळण्याच्या स्थितीत आहे. पावसाळ्यात या घरात राहणे अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे चामलाटे कुटुंबाचे म्हणणे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबाने घरकुलासाठी वारंवार अर्ज केले आहेत. ग्रामपंचायत तसेच संबंधित विभागाकडे त्यांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र अर्ज करूनही आजपर्यंत त्यांच्या नावाचा कोणत्याही मंजूर यादीत समावेश करण्यात आलेला नाही. गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांकडे गेल्या एक ते दीड वर्षांपासून चामलाटे कुटुंब सातत्याने चकरा मारत आहे. प्रत्येक वेळी त्यांना केवळ आश्वासने दिली जात आहेत, परंतु प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Related News

सध्या परिस्थिती अशी आहे की हे कुटुंब पूर्णपणे पडझड झालेल्या मातीच्या घरात राहण्यास मजबूर आहे. घराची अवस्था इतकी वाईट आहे की कधीही भिंत कोसळून अपघात होण्याची भीती आहे. तरीही शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर संतापाची भावना व्यक्त होत आहे.

गावात मात्र अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे. काही घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून काही घरांचे बांधकाम सुरू आहे. विशेष म्हणजे काही लाभार्थ्यांनी अजूनही बांधकाम सुरू केलेले नाही. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे काही लाभार्थ्यांची घरे आधीच पक्की आणि आरसीसी स्वरूपाची असूनही त्यांचा मंजूर यादीत समावेश करण्यात आल्याची चर्चा गावात सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गरजू असलेल्या कुटुंबांना योजनांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.

चामलाटे कुटुंबाला घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले का, यामागे कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिकांनी देखील या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. जर खरंच घरकुल योजनेत गैरव्यवहार झाला असेल तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

घरकुल योजना ही गरीब आणि गरजू कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळावा यासाठी शासनाने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी आढळून येतात. काही ठिकाणी पात्र लाभार्थी वंचित राहतात तर काही ठिकाणी अपात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. रामापूर येथील हे प्रकरण देखील त्याच प्रकारातील असल्याची चर्चा होत आहे.

या प्रकरणी अरुण चामलाटे यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “मी गेल्या ३० ते ४० वर्षांपासून रामापूर येथे राहतो. माझे घर मातीचे होते आणि तेही आता पूर्णपणे पडले आहे. मला आज रोजी राहण्यासाठी सुरक्षित घर नाही. तरीही मला शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून मला घरकुल योजनेचा लाभ द्यावा.”

त्यांनी पुढे असेही सांगितले की, “मला घरकुलापासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी. आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्या कुटुंबाला तात्काळ घर मिळावे हीच आमची अपेक्षा आहे.”दरम्यान, या प्रकरणात लवकरच योग्य तो निर्णय न झाल्यास उपोषणाचा इशारा देखील अरुण चामलाटे यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन या प्रकरणाची कितपत गंभीर दखल घेते आणि चामलाटे कुटुंबाला न्याय मिळतो का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/sara-arjuns-fake-post-went-viral-raj-arjun-says-the-girl-will-never-say-anything/

Related News