अकोला निमा वूमन्स फोरमचे “पंचकर्म इन जनरल प्रॅक्टिस” चर्चासत्र संपन्न

निमा वूमन्स फोरम

आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्याच्या उद्देशाने निमा वूमन्स फोरम, अकोला यांच्या वतीने रा. तो. आयुर्वेद महाविद्यालय येथे १ फेब्रुवारी २०२६ रोजी “पंचकर्म इन जनरल प्रॅक्टिस” या विषयावर एकदिवसीय सेमिनार आयोजित करण्यात आला. “आयुर्वेद ही काळाची गरज आहे” हा संदेश देणारे हे चर्चासत्र उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाला सेंट्रल निमा वूमन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ. वैशाली पडघन, अखिल भारतीय निमा अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, रा. तो. आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा देवकाते, निमा वूमन्स फोरमच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. साधना कुलकर्णी तसेच अकोला निमा शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल तोष्णीवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. सुमारे २०० आयुर्वेद पदवीधारकांनी या सेमिनारमध्ये सहभाग घेतला.

सेमिनारमध्ये विविध तज्ज्ञांनी आयुर्वेदाच्या उपचारपद्धतींचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. साधना कुलकर्णी यांनी “Recalling Aayurved” या विषयावर बोलताना आयुर्वेदाची परंपरा, त्याची वैज्ञानिकता आणि बदलत्या जीवनशैलीत त्याचे वाढते महत्त्व यावर प्रकाश टाकला. आजच्या धकाधकीच्या जीवनात नैसर्गिक उपचारपद्धतींचे स्मरण करून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Related News

नागपूरच्या डॉ. मीरा औरंगाबादकर यांनी “बस्ती जिरवी वाताची मस्ती” या विषयावर मार्गदर्शन करताना बस्ती उपचाराची प्रभावीता उदाहरणांसह स्पष्ट केली. आत्ययिक परिस्थितीतही बस्ती चिकित्सा रुग्णाला लवकर आराम देऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. तसेच “त्वचा व रक्तमोक्षण” या विषयावरील परिसंवादात त्यांनी रक्तमोक्षण उपचाराचे आरोग्यदायी फायदे आणि त्वचारोगांवरील त्याचे परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली.

मुंबईच्या डॉ. अमृता मिश्रा यांनी वंध्यत्व आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचारांवर मार्गदर्शन केले. आयुर्वेदिक चिकित्सा शरीराची समतोल अवस्था राखून नैसर्गिक पद्धतीने परिणाम साधते, त्यामुळे इतर उपचारपद्धतींपेक्षा ती अधिक प्रभावी ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित डॉक्टरांना उपचारपद्धतींबाबत नवे दृष्टिकोन मिळाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अकोला निमा वूमन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ. अलका कंठे, सचिव डॉ. मनीषा नानोटी, कोषाध्यक्ष डॉ. प्रिया मायी यांच्यासह डॉ. ज्योती कोकाटे, डॉ. मेघा माळपांडे, डॉ. अंजली राजे, डॉ. सुनिता निवाने, डॉ. माया ठाकरे, डॉ. कविता राठी, डॉ. सुजाता दीक्षित, डॉ. मधुमती नावकार, डॉ. सीमा वाकचवरे, डॉ. विजयश्री गुल्हाने, डॉ. तृप्ती बदरखे, डॉ. संघमित्रा कंकाळ, डॉ. हर्षाली भोंडे, डॉ. प्रियंका देशमुख आदी कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

या सेमिनारसाठी पाठक फार्मासिटिकल, एमिल फार्मासिटिकल, गुफिक फार्मा आणि योगायोग आयुर्वेद यांचेही सहकार्य लाभले. आयुर्वेदाचा प्रसार आणि आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात त्याचा अधिकाधिक वापर व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे चर्चासत्र उपस्थितांसाठी ज्ञानवर्धक ठरले. भविष्यातही अशा उपक्रमांमुळे आयुर्वेदाबाबत जनजागृती वाढून आरोग्यदायी समाजनिर्मितीस हातभार लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

read also : https://ajinkyabharat.com/gig-workers-strike-online-delivery-stopped-due-to-nationwide-lockdown-powerful-fight-of-gig-workers-10-big-results/

Related News