भाजपाचा थेट एकनाथ शिंदेंना धक्का? परंड्यातील राजकीय खेळीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ
भाजपाचा 1 मोठा मास्टरस्ट्रोक, एकनाथ शिंदेंना जबर धक्का : राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तास्थापनेसाठी अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती निर्णायक ठरली. मात्र, या युतीत सर्वकाही आलबेल नाही, हे परंडा विधानसभा मतदारसंघात घडत असलेल्या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते व आमदार तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.
महापालिका निवडणुकीनंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सध्या राज्यात आचारसंहिता लागू असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवलीसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र सत्ता मिळवली. मात्र, महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर महापौर कोणाचा होणार, यावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी महापौर पदाची सोडत न काढल्याने सत्तास्थापनेचा तिढा अधिक वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
अशातच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी बंडखोरी कायम ठेवत थेट भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परंडा विधानसभा मतदारसंघात धनंजय सावंतांचा गट भाजपसोबत निवडणूक लढवत असून, याला तानाजी सावंत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Related News
परंडा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र असताना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगळे लढताना दिसत आहेत. भाजपने धनंजय सावंत गटाला जिल्हा परिषदेच्या दोन तर पंचायत समितीच्या चार जागा सोडल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः धनंजय सावंत हे निजाम जवळा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे “भाजपाने थेट एकनाथ शिंदेंनाच धक्का दिला आहे का?” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
आमदार तानाजी सावंत हे अलीकडे भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मतदारसंघातच भाजपाने त्यांच्या विरोधात राजकीय डाव टाकल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. तानाजी सावंत आपल्या पुतण्याला शेवटपर्यंत आपल्या बाजूने घेतील, असा दावा केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नसल्याने तानाजी सावंत यांना राजकीय अपयशाला सामोरे जावे लागल्याचे बोलले जात आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे तानाजी सावंत यांचे दुसरे पुतणे पृथ्वीराज सावंत. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याला शिवसेना ठाकरे गटाची साथ मिळाली आहे. पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरे गटाने जिल्हा परिषद गटातील एक आणि पंचायत समिती गणातील दोन अशा एकूण तीन अधिकृत उमेदवारांचे अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि सावंत कुटुंबातील एका गटामध्ये राजकीय जवळीक वाढल्याचे चित्र आहे.
माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटात वेगळेच राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे. सावंत कुटुंबातील अंतर्गत वाद आणि वेगवेगळ्या पक्षांची साथ यामुळे हा मतदारसंघ सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांच्यातील कौटुंबिक वितुष्ट उघडपणे समोर आले असून, त्याचे पडसाद थेट निवडणूक रणांगणात उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, “कमळामुळेच आपली राजकीय गणितं जुळली,” अशी कबुली स्वतः पृथ्वीराज सावंत यांनी दिल्याने भाजपाची या भागातील रणनीती स्पष्ट होत आहे. भाजप प्रवेश रोखण्यासाठी तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजकीय फिल्डिंग लावल्याचीही चर्चा आहे. मात्र, चुलत्याच्या प्रयत्नांना मागे टाकत पुतण्या भाजपच्या उमेदवारीसाठी सरस ठरल्याचे चित्र आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न राहता, त्या महायुतीतील अंतर्गत तणाव आणि शक्तिप्रदर्शनाचे रणांगण ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील गुंतागुंतीच्या राजकीय खेळीमुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परंडा मतदारसंघातील हे राजकीय युद्ध केवळ सावंत कुटुंबापुरते मर्यादित न राहता, त्याचे परिणाम थेट राज्यातील सत्तासमीकरणांवर होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल येईपर्यंत राज्याच्या राजकारणात अशाच धक्कादायक घडामोडी पाहायला मिळतील, हे मात्र नक्की.
