अकोट बाजार समितीत पांढऱ्या सोन्याला विक्रमी भाव; कापसाला ८४१० रुपये प्रतिक्विंटल दर

अकोट बाजार समिती

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला (पांढरे सोने) यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ८४१० रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कापसाची उत्तम गुणवत्ता, व्यापाऱ्यांची वाढलेली मागणी आणि खुल्या (मुक्त) लिलाव पद्धतीने होणारी खरेदी यामुळे अकोट बाजार समितीमध्ये दरांना झळाळी आली आहे.

रेल (ता. अकोट) येथील शेतकरी सुरेश दत्ता काकडे यांना त्यांच्या कापसाला हा विक्रमी दर मिळाला. सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)च्या तुलनेत खासगी बाजारात दर अधिक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच अकोट बाजार समितीत कापसाची आवक सध्या तुलनेने घटलेली दिसत आहे.

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत विदर्भासह मराठवाडा व खान्देशातून मोठ्या प्रमाणावर कापूस विक्रीसाठी येतो. कापूस उत्पादनात घट झाली असली तरी व्यापारी व जिनिंगधारकांकडून मागणी कायम असल्याने येत्या काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related News

अकोट बाजार समितीत जाहीर लिलाव पद्धतीने पारदर्शक खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळत आहेत. व्यापारी व जिनिंग युनिट्सची संख्या अधिक असल्यामुळे स्पर्धात्मक दर तयार होतात. त्यामुळेच अकोट बाजार समितीला विदर्भातील ‘कापसाची पंढरी’ म्हणून ओळखले जाते.

विशेष म्हणजे, २०२२ मध्ये याच बाजार समितीत कापसाला १२ हजार रुपयांहून अधिक दर मिळाला होता. त्यामुळे यंदाही भावात मोठी तेजी येईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

“अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती ही विदर्भातील सर्वात मोठी कापसाची बाजारपेठ आहे. खुल्या लिलाव पद्धतीमुळे प्रत्येक शेतकऱ्याला योग्य व पारदर्शक दर मिळतो. शेतकऱ्यांचा बाजार समितीवरील विश्वास हाच आमचा नावलौकिक आहे.”

कुलदीप वसु, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट

 सीसीआय खरेदीबाबत शेतकऱ्यांची नाराजी

आजवर अनेक शेतकऱ्यांनी कापूस सीसीआय खरेदी केंद्रांवर विकला, मात्र तेथे कमाल ८०१० रुपये दर मिळाला. तसेच पैसे मिळण्यासाठी महिनोन्‌महिने प्रतीक्षा करावी लागल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सध्या बहुतांश कापूस व्यापारी व जिनिंगधारकांकडे असून भाववाढीचा नेमका फायदा शेतकऱ्यांना होतोय की व्यापाऱ्यांना, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सीसीआयकडे कापूस विकलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून विशेष मदत मिळणार का, अशी मागणीही होत आहे.

“आज माझ्या कापसाला अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत ८५०० रुपये प्रतिक्विंटल असा उच्च दर मिळाला.”

धनंजय रमेश फोकमारे, शेतकरी, वल्लभनगर

READ ALSO : https://ajinkyabharat.com/relief-for-central-government-employees-2-da-increase-fixed-in-january-2026/

Related News