प्रतिनिधी : योगेश आगासे
“एसटीचा प्रवास सुखाचा” ही एसटी महामंडळाची ओळख असली, तरी मूर्तिजापूर शहरात सध्या हा प्रवास थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील आठवडी बाजारालगत असलेल्या उड्डाणपुलावर एसटी बस थांबवून प्रवाशांना उतरविले जात असल्याने कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
मूर्तिजापूर शहरातून तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून उत्तर दिशेकडे दर्यापूरसह परिसरातील ग्रामीण भागात जाण्यासाठी हा उड्डाणपूल एकमेव आणि अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या पुलावर दिवसभर अवजड वाहनांसह खासगी वाहने, दुचाकी व एसटी बसेसची सतत वर्दळ असते. मात्र, दर्यापूरकडे जाताना उजव्या बाजूस असलेल्या थोड्याशा मोकळ्या जागेत खासगी प्रवासी वाहने आणि एसटी बसेस थांबवून प्रवासी उतरविले जात असल्याचे दृश्य नित्याचे झाले आहे.
या ठिकाणी उड्डाणपुलाच्या कडेला मोठी नाली असल्याने प्रवाशांना उतरतानाच जीव मुठीत घ्यावा लागत आहे. घाईगडबडीत बसमधून उतरताना नालीत पडण्याचा धोका कायम असतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच लहान मुलांसाठी ही जागा अत्यंत धोकादायक ठरत आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
Related News
Nagpur Rain: नागपुरात तुफान पाऊस! रस्ते जलमय, सोमलवार शाळेचं मैदान पाण्याखाली; नागरिकांची तारांबळ
E20 जनता पार्टीचा एल्गार! नितीन गडकरी थेट निशाण्यावर; शुद्ध पेट्रोलसाठी देशभर आवाज
दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदी; पोलिसांनी सांगितलं खरं कारण
Samruddhi Expressway Accident: 6 जणांचा भीषण मृत्यू; MBA साठी लेकीला पुण्यात सोडून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
ठाकरे गटाला मोठा धक्का! शिवाजी पार्कातील आंदोलनप्रकरणी आयोजकांवर 3 गुन्हे दाखल
CJP च्या संसद मार्चदरम्यान गोंधळ; विद्यार्थ्यांना रोखताना पोलिसांकडून लाठीचार्ज
CJP च्या ‘संसद मार्च’मुळे दिल्ली हाय अलर्ट; 5 हजार सुरक्षा जवान तैनात, प्रतिबंधात्मक आदेश लागू
मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे चालकाचा जीव वाचला
मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक; 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
मुंबई हादरली! कोस्टल रोड टनेलमध्ये कारला आग, 500 हून अधिक गाड्या अडकल्या
MPSC Exam 2026 : 5 मोठी कारणे; CBT निर्णयाला तीव्र विरोध, OMR पद्धत कायम ठेवण्याची जोरदार मागणी
या उड्डाणपुलाच्या परिसरातच मूर्तिजापूर शहर व तालुक्याचा कणा मानला जाणारा आठवडी बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी येथे प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी निर्माण होते. अशा परिस्थितीत उड्डाणपुलावर बस थांबविल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. परिणामी, रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा इतर आपत्कालीन सेवा अडकल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकणारी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
नागरिकांनी याबाबत अनेकदा तोंडी तक्रारी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात ठोस कारवाई होत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. किमान बाजाराच्या दिवशी तरी वाहतूक नियंत्रक नेमावा, अथवा या उड्डाणपुलावर बस थांबविण्यास पूर्णतः बंदी घालावी, अशी जोरदार मागणी सुज्ञ नागरिक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता बंडू डाखोरे यांनी सांगितले की, “संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जीविताचे महत्त्व ओळखून तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. संबंधित विभागांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घ्यावी.”दरम्यान, एसटी आगार व्यवस्थापक हेमंत चांदुरकर यांनी स्पष्ट केले की, “यापूर्वी सर्व चालक व वाहकांना संबंधित थांब्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.”तरीही प्रत्यक्ष परिस्थिती पाहता तातडीने ठोस निर्णय व अंमलबजावणीची गरज आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल मूर्तिजापूरकर विचारत आहेत.
