काँग्रेसचा विजयाचा दावा तर भाजप गोटात फिलगुड

काँग्रेस

श्रीकांत पाचकवडे


अकोला : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा दंड थोपटून आमने-सामने उभे ठाकलेल्या भाजप विरुद्ध काँग्रेस मध्ये काट्याची टक्कर झाली आहे. त्यामुळे मतदानानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा केल्या जात असुन केंडर बेस भाजपमध्ये फिलगुडचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेसच्या लढतीत वंचीत विजयाचा मार्ग सुकर करेल कां? असाही कयास लावल्या जात आहे.

देशात लोकसभेच्या 18 व्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता.26) मतदान घेण्यात आले. गत निवडणुकीत या मतदारसंघात सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजप विरुद्ध वंचीत अशी थेट लढत होऊन काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेली होती.

Related News

यंदा मात्र, भाजपच्या मराठा कार्डला काँग्रेसने मराठा कार्डनेच उत्तर दिल्याने मतदारसंघात सत्ताधारी भाजपचे अऩुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्यातच थेट लढत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. मतदारसंघातील राजकीय समीकरण पाहता बाळापुर, अकोला पश्चिम, रिसोड मतदारसंघात काँग्रेसने हात मारल्याची चर्चा आहे. तर अकोला पुर्व, अकोट, अकोला पश्चिमचा काही भागात कमळ फुलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप आणि काँग्रेसच्या या लढतीत वंचीत बहुजन आघाडीनहेी सोशल इंजिनिअरिंगचा फंडा यशस्वी करण्यावर भर दिल्याचे बोलल्या जाते.

या निवडणुकीत बाळापूर मतदारसंघ हा निर्णायक भुमिकेत असुन या मतदारसंघात मराठा, कुणबी, मुस्लीम, बौद्ध, माळी समाजाचे प्राबल्य आहे. या मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिल खोलके डॉ. अभय पाटलांना साथ दिल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात सर्वांधिक 66.58 टक्के मतदान बाळापुर मतदारसंघात झाल्याचे पहावयास मिळाले.

एकदंरीत काही मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत तर काही ठिकाणी तिरंगी लढत झाल्याने विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. सध्या तरी प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार विजयी होईल, असे दावे करीत असले या निवडणुकीत मतदारराजा कोणाला लोकसभेत पाठवतो? हे चार जुनला जाहीर होणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Related News