पुण्यातील लोहगड हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयलच्या मोबाईल सर्च हिस्ट्रीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेल, पोलीस कोठडी, राजा रघुवंशी प्रकरण आणि केतन अग्रवाल हत्येबाबत तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.
लोहगड हत्या प्रकरणात सिया गोयलच्या मोबाईलमधून धक्कादायक पुरावे; अटकेपूर्वीच जेलची तयारी केल्याचा संशय
पुण्यातील गाजत असलेल्या लोहगड हत्या प्रकरणात तपासादरम्यान आणखी एक मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिने केतन अग्रवालच्या मृत्यूपूर्वी आणि त्यानंतर इंटरनेटवर केलेल्या सर्चमुळे पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सियाने केवळ इंदूरमधील चर्चित राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची माहितीच शोधली नव्हती, तर “पोलीस कोठडीत महिलांना मारहाण केली जाते का?” अशा स्वरूपाचे प्रश्नही इंटरनेटवर शोधले होते.
या सर्च हिस्ट्रीवरून पोलिसांचा असा अंदाज आहे की, गुन्ह्यानंतर अटक होण्याची शक्यता गृहीत धरून तिने आधीच मानसिक तयारी केली असावी. तिच्या दोन्ही मोबाईल फोनमधील डिजिटल पुरावे तपासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
Related News
दुसरा मोबाईलही पोलिसांच्या हाती
दोन दिवसांपूर्वी तपास पथकाने सियाला तिच्या घरी नेऊन तिच्या बेडरूममधून दुसरा मोबाईल फोन जप्त केला. या मोबाईलमधील माहितीचे फॉरेन्सिक विश्लेषण सुरू असून अनेक डिजिटल पुरावे मिळाल्याचे समजते.
तपासादरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचाही शोध घेतला आहे. त्यांच्या जबाबांमुळे घटनाक्रम अधिक स्पष्ट होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नेमके काय आहे लोहगड हत्या प्रकरण?
पोलिसांच्या आरोपानुसार, १८ जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला सुमारे ४०० फूट खोल दरीत ढकलून त्याची हत्या केली.या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या त्यांची १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढविण्यात आली आहे.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची माहिती का शोधली?
तपास अधिकाऱ्यांच्या मते, सियाने गुगलवर राजा रघुवंशी हत्या प्रकरण वारंवार शोधले होते.
राजा रघुवंशी हा इंदूरमधील व्यावसायिक होता. लग्नानंतर पत्नी सोनम रघुवंशीसोबत तो मेघालयात हनिमूनसाठी गेला होता. काही दिवसांनी तो बेपत्ता झाला आणि नंतर त्याचा मृतदेह दरीत आढळून आला. या प्रकरणात पत्नी सोनम रघुवंशी आणि तिच्या कथित सहकाऱ्यांवर हत्या केल्याचा आरोप आहे.पोलिसांच्या मते, सियाने या प्रकरणातील तपास पद्धती, पुरावे आणि अटक प्रक्रियेबाबत माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर केला असावा.
“केतन आपल्याला वरून पाहतोय, खंबीर राहा”
तपासात आणखी एक भावनिक आणि धक्कादायक बाब समोर आली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ जून रोजी सिया गोयल केतन अग्रवालच्या घरी गेली होती. तिने केतनच्या वडिलांचे सांत्वन करताना,“केतन आपल्याला वरून पाहत आहे… खंबीर राहा.”
असे सांगितल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.यामुळे तपास यंत्रणांच्या मते आरोपीने संशय टाळण्यासाठी सामान्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला असावा.
अटकेनंतरही पश्चात्ताप नसल्याचा दावा
पोलिसांच्या तपासानुसार, १८ जून ते २३ जून या कालावधीत दोन्ही आरोपींचे दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणे सुरू होते. अटकेनंतरही त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप दिसून आला नसल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.
कोडवर्ड्सद्वारे संवाद
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे चेतन चौधरी एकाच मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड वापरत होता. पोलिसांच्या मते, तो आणि सिया गोयल एकमेकांशी कोडवर्ड्सच्या माध्यमातून संवाद साधत होते.या संवादांचे डिजिटल विश्लेषण सुरू असून तपास यंत्रणा त्यातील संदेशांचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्हायरल व्हिडिओवर वडिलांचे स्पष्टीकरण
दरम्यान, पोलीस कोठडीत नेत असताना सिया गोयलने माध्यमांसमोर मधले बोट दाखविल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
मात्र तिच्या वडिलांनी हा आरोप फेटाळला आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी घरी आणल्यानंतर वाहनाचा दरवाजा बंद होताना सियाच्या दोन बोटांना दुखापत झाली होती. ती केवळ ती जखम दाखवत होती. या दाव्याला उपस्थित पोलिसही दुजोरा देऊ शकतील, असे त्यांनी म्हटले आहे.
