शिमला: हिमाचल प्रदेशातील मंडीमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेली अभिनेत्री कंगना राणौत तिच्या विधानांमुळे सातत्यानं चर्चेत असते. त्यामुळे मंडी मतदारसंघ देशपातळीवर चर्चेत आला आहे. सध्या कंगनाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. शनिवारी एका प्रचारसभेत बोलताना कंगनानं केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली. त्यानंतर त्यांनी तेजस्वी सूर्या यांचं नाव घेतलं. तेजस्वी सूर्या मासळी खात असल्याचं सांगितलं. तेजस्वी सूर्या भाजपचे नेते आहेत. ते कर्नाटकमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत.
मंडीमध्ये येणाऱ्या सरकाघाट विधानसभा क्षेत्रात प्रचार करत असताना कंगनानं जनसभेला संबोधित केलं. ‘त्यांना स्वत:लाच माहीत नाही ते कुठे येताहेत, कुठे जाताहेत. अशा प्रकारे बिघडलेल्या शहजाद्यांचा एक पक्ष आहे. मग ते राहुल गांधी असोत, ज्यांना चंद्रावर बटाट्याचं पीक घ्यायचंय किंवा मग तेजस्वी सूर्या असोत, जे गुंडगिरी करतात. मासे दाखवून दाखवून खातात,’ असं कंगना म्हणाली.
बोलण्याच्या ओघात स्वपक्षीय नेत्यावर टीका करणाऱ्या कंगनानं पुढे अनेकांना लक्ष्य केलं. ‘अखिलेश यादव काहीतरी नको ते नको ते बोलत असतात. आमच्या इथेही एक शहजादे आहेत. त्यांना भारतात कोणीही ओळखत नाही. त्यांची ओळख केवळ हिमाचल प्रदेशात आहे. आता त्यांनी काही विधानं केली आहेत. ते म्हणतात ही महिला (कंगना) अपवित्र आहे. पण मी तर पद्मश्री पुरस्कार विजेती आहे. पण तरीही ते मला अपवित्र म्हणतात. मला इथून जाण्यास सांगतात. ही बाब चिंताजनक, निंदनीय आहे,’ अशा शब्दांत कंगनानं विरोधकांवर टीका केली.
Related News
कंगनाला राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना लक्ष्य करायचं होतं. त्यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणूक प्रचारादरम्यान मासे खात असतानाच व्हिडीओ शेअर केला होता. चैत्र नवरात्रीच्या आदल्या दिवशी त्यांनी व्हिडीओ शेअर केला होता. त्यावरुन त्यांच्यावर टीका झाली. पण कंगना बोलण्याच्या ओघात चुकल्या आणि त्यांनी तेजस्वी यादव यांच्या जागी तेजस्वी सूर्या यांचं नाव घेतलं.