अकोट: अकोट येथील नेत्ररक्षा आय व हॉस्पिटलचा “स्थानांतरण व लोकार्पण सोहळा” भव्य स्वरूपात पार पडला. या सोहळ्याद्वारे आधुनिक नेत्रसेवेच्या नव्या टप्प्याची औपचारिक सुरुवात झाली असून, आता डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांचे अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा अकोटमध्येच उपलब्ध आहेत.

सोहळ्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्र चिकित्सा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे मान्यवर उपस्थित होते. पद्मश्री डॉ. विकास महात्मे (माजी खासदार व माजी अध्यक्ष, AIIMS नागपूर) यांनी आपल्या भाषणात नेत्रसेवेबरोबरच ‘सेवा हीच परमधर्म’ या भावनेने कार्य अधिक व्यापकपणे सुरू ठेवावे असे प्रतिपादन केले.
Related News
अकोटमधील श्री शिवाजी शिक्षण संस्था येथे शिक्षण घेतलेले डॉ. प्रमोद भेडे, सध्या चेन्नई येथील शंकरा नेत्रालयात सीनिअर कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. रेटिना विषयातील त्यांच्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. मधुमेह, बदललेली आहार-विहार पद्धती, वाढलेला स्क्रीन टाइम यांसारख्या कारणांमुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपचाराबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विचारपीठावर डॉ. अनिल तिवारी (माजी नेत्रविज्ञान प्रमुख, PDMMC अमरावती), डॉ. शिरीष थोरात (अध्यक्ष, MOS फेंको व लॅसिक सर्जन), डॉ. अशोकराव टेकाडे (संचालक, VYWS डेंटल कॉलेज अमरावती) यांसारखी मान्यवर उपस्थित होती.
अस्पायर इन्स्टिट्यूट अकोलाचे संस्थापक सचिन बुरघाटे यांनी रुग्णालयातील आधुनिक तंत्रज्ञान, वैद्यकीय ज्ञान आणि रुग्णांचे समाधान याबाबत माहिती दिली व सांगितले की या त्रिसूत्रीमुळेच डॉक्टर समाजाचे विश्वासू सेवक म्हणून लोकमान्यात राहतात.
लोकार्पणाचा दिवस नेत्ररक्षा आय हॉस्पिटलच्या वाटचालीतील सुवर्णक्षण ठरला. आता डोळ्यांवरील उपचारासाठी बाहेरगावी जाण्याची गरज राहिली नाही, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
डॉ. सुहास कुलट, डॉ. दर्शन कुलट आणि डॉ. ऐश्वर्या दर्शन कुलट (परब) यांच्या रूपाने सेवाभावी वृत्ती, तंत्रज्ञानातील प्रावीण्य आणि तज्ञ उपचार एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने उपस्थितांनी स्तुतिसुमने उधळली. गेल्या ४२ वर्षांपासून रुग्णसेवा व समाजसेवा या व्रताने कार्यरत असलेले डॉ. सुहास कुलट यांनी अल्पावधीतच नेत्ररक्षा आय हॉस्पिटलला लोकप्रियता मिळवून दिली आहे.
लोकार्पण सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि शुभेच्छुक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, ज्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
read also : https://ajinkyabharat.com/nagaswami-maharaj-padukanchi-mirvanuk-and-dindi-sohla/
