महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा
अकोला, दि. २० : ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) ही एक प्रभावी आणि महत्त्वाची संधी असून, या योजनेअंतर्गत मंजूर सर्व कामे विहित वेळेत व गुणवत्तापूर्णरीत्या पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. शेतकऱ्यांना थेट शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी मातोश्री पानंद रस्ते तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते या योजनांतील कामे आराखड्यानुसार आणि प्राधान्याने पूर्ण करावीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजय पाटील, उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. कामगारांना वेळेत मजुरी मिळावी, यासाठी उपस्थिती नोंद, कामांची अद्ययावत माहिती, आधार प्रमाणीकरण तसेच ई-केवायसीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. या बाबींमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Related News
ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असून, योजनांचा लाभ थेट गरजू घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे निर्देश देताना त्यांनी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. कागदोपत्रीच नव्हे तर प्रत्यक्ष क्षेत्रात दिसेल असा विकास होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
नरेगाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आवारभिंती बांधकाम, प्रसाधनगृह उभारणी यांसारखी सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची कामे गुणवत्तेची असावीत, याकडेही जिल्हाधिकारी मीना यांनी लक्ष वेधले. ही कामे केवळ पूर्ण करण्यापुरती मर्यादित न राहता टिकाऊ व उपयोगी ठरतील याची खात्री करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नरेगाची कामे सुरू असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन नियमित तपासणी करावी. कामांची प्रगती, गुणवत्ता आणि मजुरांच्या अडचणी यांचा थेट आढावा घेऊन तात्काळ आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. यामुळे योजनेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ग्रामसभेचे महत्त्व अधोरेखित करताना जिल्हाधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, ग्रामसभेच्या माध्यमातून गावाच्या गरजेनुसार महत्त्वपूर्ण विकासकामांचे आराखडे तयार करण्यात यावेत. लोकसहभागातून ठरवलेली कामे अधिक प्रभावीपणे पूर्ण होतात आणि त्यामुळे ग्रामविकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळते. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वयातूनच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
read also : https://ajinkyabharat.com/major-police-action-in-malkapur-city/
