महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अखेर मोठा निर्णय समोर आला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत विलिनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून त्यामुळे सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं मानलं जात आहे.
राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार का? याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे स्वतः शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात सकारात्मक संकेत दिल्याने या चर्चांना अधिक बळ मिळालं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते तसेच विरोधकांचे लक्ष या संभाव्य विलिनीकरणाकडे लागले होते.
दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष संघटना, आगामी निवडणुका आणि राजकीय रणनीती या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर.
Related News
बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाने या विषयावर स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे काही नेत्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नसल्याचं सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या वक्तव्यानंतर बैठकीत काही काळ शांतता पसरल्याचं सांगितलं जात आहे. कारण अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना अजूनही दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील अशी अपेक्षा होती. मात्र वरिष्ठ नेतृत्वाकडून आलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे आता या चर्चांवर जवळपास पडदा पडल्याचं चित्र आहे.
विशेष म्हणजे या बैठकीदरम्यान शरद पवार स्वतः उपस्थित होते. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विलिनीकरण होणार नसल्याची भूमिका मांडल्यानंतर शरद पवार यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे त्यांनी मौन ठेवून अप्रत्यक्षपणे या निर्णयाला सहमती दर्शवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काही पदाधिकाऱ्यांनी मात्र शरद पवार यांनी स्वतः स्पष्ट भूमिका मांडायला हवी होती अशी अपेक्षा व्यक्त केली. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजपर्यंत शरद पवार यांचे निर्णय आणि भूमिका पक्षासाठी अंतिम मानल्या जातात. त्यामुळे त्यांच्या अधिकृत वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बैठकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आता सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही महाराष्ट्रात उभे राहणार आहोत. विलीनीकरणाचा विषय आता संपला आहे,” असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले.
शशिकांत शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, दोन्ही गटांमध्ये विचारसरणीपेक्षा नेतृत्वाचा प्रश्न अधिक मोठा ठरला आहे. अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, तर शरद पवार गटाने विरोधी पक्षाची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे दोन्ही गटांच्या राजकीय दिशांमध्ये मोठा फरक निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत विलिनीकरण होणं कठीण असल्याचं अनेक जाणकार आधीपासून सांगत होते.
दुसरीकडे, कार्यकर्त्यांमध्येही मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही कार्यकर्त्यांना दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत असं वाटत होतं. तर काहींना स्वतंत्र राजकीय ओळख कायम ठेवणं अधिक योग्य वाटत आहे. विशेषतः युवा कार्यकर्त्यांमध्ये शरद पवार गटाने आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी अशी मागणी वाढताना दिसत आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील रणनीती काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाची भूमिका, आगामी निवडणुकांतील जागावाटप आणि भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अजित पवार गटाविरोधातील राजकीय लढाई यावर पुढील काही महिन्यांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आजच्या बैठकीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सध्या तरी स्वतंत्रपणेच आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात आणखी मोठे राजकीय ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
read also : https://ajinkyabharat.com/a-strange-countrys-unique-tradition-wearing-a-taint/
