Thailand News: थायलंडमध्ये फिरायला गेलेल्या 4 भारतीय तरुणांवर काळाचा घाला; कॅफेत एकापाठोपाठ कोसळले, एकाचा मृत्यू, तिघे गंभीर
थायलंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ फुकेत येथे भारतीय पर्यटकांसोबत घडलेल्या एका रहस्यमय घटनेनं खळबळ उडाली आहे. सुट्टीसाठी थायलंडला गेलेल्या चार भारतीय तरुणांना एका कॅफेमध्ये अचानक चक्कर येऊन ते एकापाठोपाठ बेशुद्ध पडले. या धक्कादायक घटनेत एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून उर्वरित तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर थायलंड पोलिस, स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावास सतर्क झाले असून नेमकं काय घडलं याचा तपास सुरू आहे.
ही घटना फुकेतमधील कथू जिल्ह्यातील कमला बीच परिसरात घडली. शनिवारी पहाटेच्या सुमारास एका प्रसिद्ध कॅफेमध्ये हे सर्व भारतीय पर्यटक अचानक बेशुद्ध पडले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी तत्काळ आपत्कालीन सेवांना माहिती दिली. त्यानंतर सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं.
भारतीय दूतावासानं या घटनेची अधिकृत माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली. दूतावासानं म्हटलं की, “9 मे 2026 रोजी फुकेतमध्ये चार भारतीय पर्यटक बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यातील एका तरुणाचा मृत्यू झाला असून आम्ही त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत. उर्वरित तिघांच्या प्रकृतीवरही बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे.”या घटनेमागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या प्रकरणाभोवती गूढ अधिकच वाढलं आहे. स्थानिक पोलिसांनी कॅफेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून त्या रात्री नेमकं काय घडलं याचा शोध घेतला जात आहे.
Related News
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान पाच भारतीय तरुण एकत्र त्या कॅफेमध्ये आले होते. सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या तरुणांची नावं कुशाग्र अग्रवाल, राहुल अग्रवाल, अमन अग्रवाल आणि आर्यन वर्मा अशी आहेत. पाचव्या व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.रात्री उशिरापर्यंत हे सर्वजण कॅफेमध्ये होते. मात्र पहाटे दोनच्या सुमारास अचानक एकामागून एक चार तरुण कोसळू लागले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत मागवली. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचताच सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आलं.
विशेष म्हणजे या गटातील आर्यन वर्मा नावाच्या तरुणामध्ये कोणतीही गंभीर लक्षणं दिसून आली नाहीत. तर उर्वरित तिघांची प्रकृती चिंताजनक होती. कुशाग्र आणि राहुल अग्रवाल यांना कोमामध्ये असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांना पुढील उपचारासाठी फुकेत रुग्णालयात हलवण्यात आलं.
पोलिसांनी रुग्णालयात जाऊन संबंधित तरुणांचे जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघेही बोलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे चौकशी होऊ शकली नाही. त्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कॅफेमध्ये खाल्लेल्या अन्नामुळे विषबाधा झाली का? कोणत्या ड्रिंक किंवा पदार्थामुळे ही स्थिती निर्माण झाली? किंवा यामागे दुसरं काही कारण आहे का? याबाबत पोलिस विविध शक्यता तपासत आहेत.थायलंड पोलिसांनी कॅफेमधील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती समोर येत आहे. फॉरेन्सिक टीमकडूनही घटनास्थळाची तपासणी करण्यात आली आहे. मृत तरुणाच्या शवविच्छेदन अहवालानंतरच नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय पर्यटकांमध्ये या घटनेनंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. फुकेत हे भारतीय पर्यटकांसाठी अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ मानलं जातं. दरवर्षी हजारो भारतीय येथे सुट्टीसाठी जातात. मात्र या घटनेनं सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
