यवतमाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या झोनल लेव्हल स्विमिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘मास्टर पॉवर स्विमिंग क्लब’च्या जलतरणपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या विभागीय स्पर्धेत अकोल्याच्या या गुणवान खेळाडूंनी तब्बल १६ पदकांची कमाई करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत उत्कृष्ट टायमिंगची नोंद करत विरोधकांना मागे टाकले आणि पदकांची लयलूट केली.
अकोल्याच्या चमकलेल्या ताऱ्यांची सुवर्ण कामगिरी:
Related News
१७ वर्षांखालील मुले (Under-17 Boys):
रुद्र संजय पवार: याने आपल्या अद्भूत कौशल्याच्या जोरावर त्रिशतकी सुवर्ण कामगिरी केली. त्याने ५० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर फ्री स्टाईल आणि ५० मीटर बटर स्ट्रोक या तिन्ही प्रकारांत सुवर्ण पदक पटकावून क्लबचे नाव उंचावले.
१४ वर्षांखालील मुले (Under-14 Boys):
पार्थ राम राठोड : याने २५ मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण पदक, तर ५० मीटर फ्री स्टाईल आणि १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये रजत पदक मिळवून चमकदार कामगिरी केली.
सक्षम राहुल इंगळे : याने २५ मीटर व ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात सुवर्ण पदक आणि १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रजत पदक पटकावले.
अनुज आशिष पनपालिया : याने २५ मीटर बटरफ्लाय स्ट्रोक आणि ५० मीटर बटरफ्लाय स्ट्रोक अशा दोन्ही प्रकारांत सुवर्ण पदक जिंकले, तसेच २५ मीटर फ्री स्टाईलमध्ये रजत पदक आपल्या नावावर केले.
१४ वर्षांखालील मुली (Under-14 Girls):
लावण्या गणेश कटारे: हिने मुलींच्या गटात अकोल्याचा दबदबा निर्माण करत २५ मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण पदक, २५ मीटर बॅक स्ट्रोक गाठत रजत पदक आणि ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्य पदक पटकावले.
१२ वर्षांखालील मुले (Under-12 Boys):
प्रणव प्रशांत गवई: या छोट्या जलतरणपटूने आपल्या कौशल्याने सर्वांना थक्क केले. त्याने अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या २०० मीटर फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले.
कोच योगेश अनंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन
खेळाडूंच्या या दैदिप्यमान यशामागे मुख्य प्रशिक्षक एन आय एस (नॅशनल कोच) योगेश अनंत पाटील यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि कडक प्रशिक्षण लाभले. योगेश पाटील यांनी प्रत्येक खेळाडूच्या कौशल्यावर विशेष लक्ष देऊन, त्यांच्याकडून करून घेतलेली अहोरात्र मेहनत आणि दिलेल्या अचूक तंत्रशुद्ध टिप्समुळेच अकोल्याच्या या मुलांनी यवतमाळमध्ये अकोला जिल्ह्याचा दबदबा निर्माण केला. त्यांच्या या उत्कृष्ट मार्गदर्शनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
क्लबच्या सदस्यांकडून खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन
या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद यशाबद्दल मास्टर पॉवर स्विमिंग क्लबचे सदस्य विशाल पोहेकर, प्रमोद खंडारे, सुशील कांबळे, मोहिल खरात, दिनेश वाघ, ज्योती पनपालिया, कविता जावरकर, मनीषा वंजारी, प्रथमेश डोईफोडे, आकाश यादव, गायत्री सरदार, पल्लवी शिंदे, आदित्य थोरात आणि रामकृष्ण रोहनकर, अमन इंगळे यांनी सर्व विजेत्या मुलांचे, कोच योगेश पाटील आणि पालकांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
“हा आमच्या अकोल्याच्या खेळाडूंच्या कडक शिस्तीचा, कोच योगेश पाटील सरांच्या मार्गदर्शनाचा आणि मुलांच्या सातत्याचा विजय आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही हे खेळाडू अशीच चमकदार कामगिरी करतील,” असा विश्वास क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केला.
अकोलेकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
झोनल पातळीवर १६ पदके जिंकून अकोला जिल्ह्याचे नाव क्रीडा जगतात उंचावणाऱ्या या सर्व बाल व तरुण जलतरणपटूंवर सध्या संपूर्ण जिल्ह्यातून, क्रीडाप्रेमींकडून आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या अभूतपूर्व यशामुळे जिल्ह्यातील इतर उगवत्या खेळाडूंनाही मोठी प्रेरणा मिळाली आहे.
