मुलीच्या हत्येबद्दल बापलेकाला अटक आणि 20 दिवसांनी मुलगी स्वतः पोलिसांकडे हजर; अजब प्रकाराने पोलीस चक्रावले
बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकाच गोंधळात टाकणारा प्रकार समोर आला आहे. ज्या तरुणीची हत्या झाल्याचा दावा करत पोलिसांनी तिच्या वडिलांना आणि भावाला अटक केली होती, तीच तरुणी तब्बल 20 दिवसांनी जिवंत अवस्थेत पोलिसांसमोर हजर झाल्याने संपूर्ण पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे बुलढाणा पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. विशेष म्हणजे मृतदेहाजवळ काही अंतरावर महिलेचे शिरही सापडले होते. या भीषण घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने पुढे नेण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी हा मृतदेह मध्य प्रदेशातील शिवानी बापूराव कळमेकर या तरुणीचा असल्याचा निष्कर्ष काढला. शिवानी विवाहित असून तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनैतिक संबंधांमुळे कुटुंबीयांनीच तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानुसार शिवानीचे वडील बापूराव कळमेकर आणि तिच्या भावाला अटक करण्यात आली. दोघांनाही न्यायालयात हजर करून जेलमध्ये पाठवण्यात आले.
Related News
बुलढाणा पोलिसांची गंभीर चूक; हत्येचा गुन्हा दाखल, पण मुलगी निघाली जिवंत
मात्र, या प्रकरणाला धक्कादायक वळण तेव्हा मिळाले, जेव्हा शिवानी कळमेकर स्वतः जिवंत अवस्थेत पोलिसांसमोर हजर झाली. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी तिच्या प्रियकरासोबत बुऱ्हानपूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने आपण जिवंत असल्याचे सांगितले. तसेच आपल्या हत्येच्या आरोपाखाली वडील आणि भाऊ यांना अटक करण्यात आल्याचे समजताच तिने धक्कादायक खुलासा केला.
शिवानीच्या या जबाबानंतर पोलिस यंत्रणाच हादरली आहे. कारण ज्या महिलेचा मृतदेह सापडला होता, तो नेमका कोणाचा? असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यामुळे तपासातील अनेक त्रुटी उघड होत आहेत.
विशेष म्हणजे बुलढाणा पोलिसांनी मृतदेहाची डीएनए तपासणी पूर्ण होण्यापूर्वीच शिवानीच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली, असा आरोप आता केला जात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच केवळ संशयाच्या आधारावर कारवाई केल्याने पोलिसांच्या निष्काळजीपणावर टीका होत आहे.
दरम्यान, शिवानी जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर तिचे वडील आणि भावाच्या सुटकेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. निष्पाप लोकांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले का? याचाही तपास होण्याची मागणी होत आहे.
या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी बुलढाणा पोलिसांच्या निष्काळजी कारभारावर संताप व्यक्त केला आहे. काहींनी तर “डीएनए रिपोर्टशिवाय हत्या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा कसा केला?” असा सवाल उपस्थित केला आहे.
