तरीही 5-6 तासांत इंधन संपतंय! महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल संकट गंभीर; पंपांवर किलोमीटरच्या रांगा

नो फ्युएल

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत असून काही ठिकाणी तर अवघ्या 5 ते 6 तासांतच इंधन संपत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीमुळे मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलची साठवणूक सुरू झाली आहे. कॅन, ड्रम आणि बाटल्या घेऊन नागरिक पंपांवर पोहोचत असल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.

राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ‘पेट्रोल संपले’, ‘डिझेल उपलब्ध नाही’ असे फलक लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून वारंवार आवाहन करूनही नागरिक अतिरिक्त साठा करत असल्याने पुरवठ्यावर ताण वाढत आहे. प्रशासनाकडून इंधनाचा पुरेसा साठा असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये नागरिकांना तासन्तास रांगेत उभं राहावं लागत आहे.

जळगावमध्ये भीषण परिस्थिती

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. कुऱ्हा परिसरातील एसआर पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. वाहनांच्या रांगा तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंत गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक नागरिक रात्रीपासूनच रांगेत उभे असल्याची माहिती समोर आली आहे.

Related News

कुऱ्हा येथील दुसऱ्या द्वारका किसान पेट्रोल पंपावर मागील दोन दिवसांपासून पेट्रोल उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहे. परिणामी आसपासच्या पंपांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं असलं तरी नागरिकांमधील भीती काही कमी होताना दिसत नाही.

परभणीत वाहनांच्या रांगा

परभणी शहरातील वसमत रोड परिसरातही पेट्रोल-डिझेलसाठी मोठी गर्दी होत आहे. जिओ पेट्रोल पंप आणि अमोल पेट्रोल पंपाच्या बाहेर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. अनेक वाहनचालकांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

विशेष म्हणजे, अनेक नागरिक डिझेलसाठी कॅन घेऊन येत असल्याने पंप परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली. पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाशिममध्ये पहाटेपासून कॅनच्या रांगा

वाशिम जिल्ह्यात परिस्थिती आणखी गंभीर दिसून येत आहे. शहरातील बहुतांश पेट्रोल पंप सकाळी बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रिसोड रोडवरील टिल्लूमल पेट्रोल पंपावर डिझेल वितरण सुरू असलं तरी पहाटे 4 वाजल्यापासूनच नागरिकांनी कॅनच्या रांगा लावल्या होत्या.

सकाळीच 1000 ते 1500 कॅन रांगेत असल्याचं पाहायला मिळालं. ही रांग पेट्रोल पंपाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर 100 ते 150 मीटरपर्यंत पोहोचली होती. डिझेलअभावी शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असून शेतीची कामं खोळंबली आहेत. अनेक शेतकऱ्यांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागत आहे.

बुलढाण्यात शेतकऱ्यांचा संताप

बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईचा फटका सर्वाधिक शेतकऱ्यांना बसत आहे. ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेती मशागतीची कामं थांबली आहेत. संतप्त शेतकरी आणि ट्रॅक्टर चालकांनी काल मध्यरात्री पुणे-नागपूर महामार्ग रोखून आंदोलन केलं.

चिखलीजवळील मेहकर फाटा परिसरात अनेक ट्रॅक्टर चालक दुपारपासून रांगेत उभे होते. मात्र रात्री उशिरापर्यंतही डिझेल न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त करत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. जवळपास एका तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

प्रशासनाचं आवाहन

दरम्यान, विविध जिल्ह्यांतील प्रशासनाने नागरिकांना घाबरून अतिरिक्त इंधन साठवू नये, असं आवाहन केलं आहे. इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर इंधन साठवण्याकडे वळत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणावर साठवणूक केल्यामुळेच कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन घेतलं जात असल्याने सामान्य नागरिकांना फटका बसत आहे.

शेतकरी आणि सामान्य नागरिक त्रस्त

इंधन टंचाईचा सर्वाधिक परिणाम शेतकरी, मालवाहतूक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांवर होत आहे. ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रणांना डिझेल न मिळाल्याने शेतीची कामं रखडली आहेत. दुसरीकडे वाहनधारकांना तासन्तास रांगेत उभं राहावं लागत असल्याने संताप वाढत आहे.

काही भागांमध्ये पेट्रोल पंपांवर किरकोळ वादावादी आणि धक्काबुक्कीचे प्रकारही समोर येत आहेत. पोलिस प्रशासन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असलं तरी गर्दी कमी होताना दिसत नाही.

राज्यातील ही परिस्थिती नेमकी कधी सुरळीत होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

read also : https://ajinkyabharat.com/before-completing-2-years-of-laganala-zaheer-iqbals-shocking-question-came-to-sonakshi-sinhas-face/

Related News