मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शरद पवार
गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
Related News
विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली असून जनावरांचे जीवितहानीचे प्रकारही
घडले आहेत. मात्र, अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत आणि जे झाले आहेत त्यांनाही मदत मिळालेली नाही, असा आरोप शिंदे यांनी केला. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ
जाहीर करून एकरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने दुर्लक्ष केले तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारू, असा इशारा देखील शिंदे यांनी दिला. महायुती सरकारने निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले
होते. मात्र, अद्याप सरसकट कर्जमाफीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात येऊन अतिवृष्टीग्रस्त भागांचा आढावा घेतला. राज्यातील अनेक भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात
आला आहे. तापी, हतनूर, अंबा-जगबुडी, वशिष्टी या नद्यांवर पाणीपातळी वाढल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबईसह राज्यात पुढील काही दिवसांमध्ये अजून जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार, मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की,
शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पावसामुळे झालेल्या शेती व जनजीवनाच्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली असून आता राज्य सरकारची
भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/vice-presidential-padasathi-nda-cha-umedwar-jaheer/