Sonam Wangchuk : भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात जाऊन सोनम वांगचूक यांची भेट घेतली; नेमकं काय घडलं?

Sonam Wangchuk

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली Sonam Wangchuk यांची भेट; नेमकं काय घडलं?

सामाजिक कार्यकर्ते Sonam Wangchuk यांची प्रकृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना उपचारासाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं. यानंतर मंगळवारी रात्री उशिरा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांनी रुग्णालयात जाऊन सोनम वांगचूक यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हेदेखील उपस्थित होते. या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Sonam Wangchuk  हे सध्या मेदांता रुग्णालयातील आयसीयू-8 मध्ये उपचार घेत आहेत. डॉ. सुशीला कटारिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या भेटीदरम्यान नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोनम वांगचूक यांची घेतलेली भेट राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

Sonam Wangchuk यांना मेदांता रुग्णालयात हलवलं

Sonam Wangchuk  यांना काही दिवसांपूर्वी उपचारासाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी केली होती. यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Related News

या याचिकेवर मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सोनम वांगचूक यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी दिली.

न्यायालयाने मेदांता रुग्णालयात सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक तयार करण्याचे निर्देश दिले. कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यायचे, हा निर्णय घेण्याचा अधिकार रुग्णाला असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 19 आणि 21 अंतर्गत हा मूलभूत अधिकार असल्याचं न्यायालयाने नमूद केलं.

केंद्र सरकारचा रुग्णालय बदलण्यास विरोध नाही

सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयासमोर आपली भूमिका स्पष्ट केली. सोनम वांगचूक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास केंद्र सरकारचा कोणताही आक्षेप नसल्याचं सांगण्यात आलं.

मात्र, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सोनम वांगचूक यांनी सतत वैद्यकीय देखरेखीखाली राहणं आवश्यक असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. तसेच मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांना डिस्चार्ज देण्यात येऊ नये, अशी मागणीही करण्यात आली.

न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी संध्याकाळी सोनम वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर काही तासांतच केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

नड्डा यांच्या भेटीने चर्चांना उधाण

Sonam Wangchuk  यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जे. पी. नड्डा रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचल्याने या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सध्या जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलकांमध्ये तणावाचं वातावरण असल्याचं चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर नड्डा यांनी सोनम वांगचूक यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली किंवा आंदोलनाबाबत कोणता मुद्दा मांडण्यात आला, याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा आणखी तापला आहे. विद्यार्थ्यांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू असून, गेल्या काही दिवसांत या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात तरुणांचा प्रतिसाद मिळत आहे.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, आंदोलकांच्या वतीने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करण्यात आलेल्या मागण्यांवर केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी वाढत आहे.

आंदोलकांच्या मागण्यांवर सरकारकडून निर्णय कधी घेतला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरकारकडून अद्याप ठोस भूमिका जाहीर न झाल्याने आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी परिसर केला होता रिकामा

दरम्यान, सोमवारी दुपारी पोलिसांनी जंतर-मंतर परिसर रिकामा केला होता. मात्र, त्यानंतर रात्री पुन्हा मोठ्या संख्येने आंदोलक तिथे जमा होऊ लागले. गेल्या पाच दिवसांपासून आंदोलनस्थळी तरुण-तरुणांची संख्या सातत्याने वाढत आहे.

Sonam Wangchuk  यांची प्रकृती, त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यासंदर्भातील न्यायालयीन निर्णय आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची रुग्णालयातील भेट या सर्व घडामोडींमुळे आंदोलनाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

एकीकडे सोनम वांगचूक यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असताना दुसरीकडे जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार आंदोलकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतं आणि आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला जातो का, याकडे आता देशाचं लक्ष लागलं आहे.

Related News