पातूर : आईच्या कुशीत सुरक्षित असायला हवं होतं, मायेच्या ऊबेत श्वास घ्यायला हवा होता; पण नियतीने त्या निष्पाप चिमुकल्या जीवासाठी काळोखाची विहीर निवडली. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली असून, ग्राम माझोळ येथे नवजात बालकाला निर्दयपणे विहिरीत फेकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून समाजमन हादरून गेले आहे.
पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्राम माझोळ येथे मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री ही अमानुष घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळच्या सुमारास गावातील काही नागरिक विहिरीजवळ गेले असता पाण्यात काहीतरी संशयास्पद तरंगताना दिसून आले. जवळ जाऊन पाहणी केली असता विहिरीत नवजात बालक असल्याचे लक्षात येताच नागरिकांची एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती तात्काळ पातूर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल तारासिंग राठोड, पोलीस हवालदार राजू ठाकरे आणि पोलीस शिपाई शंकर बोरकर हे घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत उतरून नवजात बालक बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
Related News
जुना वाद विकोपाला गेला, पाच जणांनी अनिकेतला शेतात गाठलं, निर्घृणपणे संपवलं
मूर्तिजापूरमध्ये बेपत्ता इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला
मूर्तिजापूरातून १५ वर्षीय मुलगी बेपत्ता; अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
Akola Accident 2 Deaths : भीषण अपघातात दाम्पत्याचा दुर्दैवी अंत, 10 फूट खड्ड्यात उलटली कार – थरारक घटना
Akola Crime : 7 धक्कादायक सत्य! प्रेमाच्या नावाखाली फसवणूक, गर्भवती तरुणी अन् नराधमाची अटक
तरुणावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी काही तासांतच गजाआड
दिवसा ढवळ्या स्कुटीच्या डिक्कीतील ३५ हजारांची चोरी; खानापूर रोडवर खळबळ
पोलिसांनी पुढील कार्यवाही करत नवजात बालकाचा मृतदेह अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (पोस्टमॉर्टेम) पाठवला आहे. बालक जन्मत:च मृत होते की जिवंत असताना विहिरीत टाकण्यात आले, याबाबतचा अहवाल शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या नवजात बालकाचे आई-वडील कोण आहेत, तसेच बालकाला इतक्या निर्दयपणे विहिरीत टाकण्यामागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. सामाजिक दबाव, अवैध संबंध, भीती, आर्थिक अडचणी की अन्य कोणते गंभीर कारण यामागे दडले आहे, याचा तपास पोलीस सखोलपणे करत आहेत.
पातूर पोलिसांकडून परिसरातील गर्भवती महिला, अलीकडील प्रसूती झालेल्या महिला, खासगी दवाखाने, आरोग्य उपकेंद्र यांची माहिती घेतली जात असून संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय अहवाल, घटनास्थळाची पाहणी आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपासाला वेग देण्यात आला आहे.
या अमानुष घटनेमुळे ग्राम माझोळसह संपूर्ण पातूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. “नवजात बालकाच्या हत्येसारख्या घृणास्पद कृत्यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी,” अशी जोरदार मागणी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांकडून होत आहे.
एका निष्पाप जीवाचा असा अंत समाजाच्या संवेदनशीलतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करत असून, माणुसकी कुठे हरवली? असा सवाल पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनात घोळत आहे.
